कुतूहल न्यूज नेटवर्क
Nashik Oxygen Leak: नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे 22 जणांचा मृत्यू
नाशिकमधील झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून झालेल्या गळतीमुळे 22 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अन्न व सुरक्षा मंत्री डॉ. राजेंद्र शिंगाणे यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून जे या घटनेसाठी जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. सध्या रुग्णालयात रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात येत आहे.
हॉस्पिटलमध्ये १३१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. या रुग्णांना टँकरमधून एका पाइपद्वारे एकाचवेळी ऑक्सिजनचा पुरवठा होत होता. मात्र टँकरमध्ये गळती झाली आणि ऑक्सिजन पुरवठ्यावर परिणाम झाला. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे ऑक्सिजन अभावी गुदमरून ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. काही रुग्णांची स्थिती गंभीर आहे. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.
It’s an unfortunate incident. As per preliminary info, we’ve learnt that 11 people died. We’re trying to get a detailed report. We’ve ordered an enquiry as well. Those who are responsible will not be spared: FDA Minister Dr Rajendra Shingane on Nashik Oxygen tanker leak incident pic.twitter.com/sT7M8XbatF
— ANI (@ANI) April 21, 2021
घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले. ज्यांनी ऑक्सिजन प्लांट बसवला त्यांच्या तंत्रज्ञांपैकी एकही व्यक्ती घटनास्थळी नव्हती, असे शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.
स्थानिक प्रशासनाने कळवलं की, नाशिकमध्ये आलेल्या टँकरमधील वॉल्वमध्ये लीकेज असल्याने ऑक्सिजन वाया गेला. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण माहिती घेऊन परिपत्रक जारी केलं जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
नाशिकमधील ऑक्सिजन गळती दुर्दैवी आहे. ही सर्वस्वी सरकारची चूक आहे, असं म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली. तसचं निष्काळजीपणामुळे आणखी किती बळी घेणार असा सवालही विचारला. दरम्यान जबाबदार असणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.