fbpx

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर

कुतूहल न्यूज नेटवर्क

सोलापूर :  पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार नाव निश्चित करण्यात आलं आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवाराच्या नावाची आज दुपारी घोषणा केली. दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाकडून समाधान महादेव आवताडे यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं निधन झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या मतदारसंघात आता १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत असून, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार निश्चितबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. उमेदवारीबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, त्यांच्या उमेदवारीला पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या निर्णयाकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं.

जयंत पाटील यांनी ट्वीट करून भगीरथ भालके यांच्या नावाची घोषणा केली आणि त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. “शरद पवार यांच्या मान्यतेनं पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात येत आहेत. ते नक्की विजय होतील, असा आम्हाला विश्वास आहे. भगीरथ भालके यांना शुभेच्छा!,” असं पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *