fbpx

पांगरी- लोकन्यायालयात १०२ प्रकरणे निकाली

कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी “पॅन इंडिया अवेयरनेस अँड आउटरिच प्रोग्राम” (PAN India Awareness and Outreach Program) या उपक्रमाअंतर्गत जिल्हा विधीसेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार तालुका विधीसेवा समिती बार्शी आणि वकिल संघ बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ ते १८ ऑक्टोबर या तीन दिवशी अनुक्रमे पांगरी, भोईंजे आणि वैराग या गावी फिरते लोक अदालत आणि कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन केले होते.

दि.१६ ऑक्टोबर रोजी पांगरी ता. बार्शी याठिकाणी फिरते लोक अदालत आणि कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोक अदालतच्या सुरूवातीला मार्गदर्शन करताना सह दि. न्या. क. स्तर जे.ए. झारी यांनी छोटी आणि किरकोळ वाद आपापसांत मिटवून घेऊन एकोप्याने राहवे. तरूण पिढीने आपल्या वयोवृद्ध पालकांचा सांभाळ योग्य रित्या करावा याबाबत सल्ला दिला.

अ‍ॅड. ए. आर. पाटील यांनी वयोवृद्ध नागरिकांचे हक्क आणि अधिकार, त्यांची कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी एस. एस. सावंत यांनी तडजोडीने प्रकरण मिटवल्यामुळे होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन करून जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवावेत असे आवाहन केले.

फिरते लोक अदालतसाठी पॅनल प्रमुख म्हणून बार्शी येथील सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर जे. ए. झारी यांची नेमणूक करण्यात आली. अ‍ॅड. ए.आर. पाटील आणि अ‍ॅड. आर. डी. तारके यांची पॅनल मेंबर म्हणून नियुक्ती करण्यात आली. या लोक अदालतीस नागरिकांनी भरगोस प्रतिसाद दिला असून सदर लोक अदालतीमध्ये एकूण १०२ दाखलपुर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यामधून ग्रामपंचायत पांगरी यांना कराच्या स्वरूपात तडजोडीने एकूण ७ लाख ३५ हजार रूपये एवढ्या रकमेची वसूली झाली. यासोबतच न्यायालयात प्रलंबित असणारे ३ दिवाणे दावेही तडजोडीने निकाली काढण्यात आले.

या कायदेविषयक शिबिराचे सुत्रसंचालन इरशाद शेख यांनी केले. शिबिरास तसेच लोक अदालतीस वकिल संघाच्या उपाध्यक्षा रत्नमाला पाटील, अ‍ॅड. संजय कोकाटे, अ‍ॅड. रियाज बागवान, अ‍ॅड. अभिजित पाटील, स्वयंसेविका कांचन क्षिरसागर, पोउनि ननवरे, सरपंच सुरेखा लाडे, उपसरपंच धनंजय खवले, ग्रामविकास अधिकारी सिद्धेश्वर चौधरी, प्रा. विलास जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य, बॅक ऑफ इंडियाचे अधिकारीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन तालुका विधीसेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-१, बार्शी जयेंद्र सी. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विधीसेवा समितीचे कर्मचारी आनंद पानगांवकर, विष्णू नाईकवाडी आणि विनायक घाडगे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *