कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: पुरी (ता.बार्शी) शिवारात मध्यरात्री नांगरणी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकासह शेतमालकाचे धोतराने हातपाय बांधून ट्रॅक्टर व नांगर चोरून नेहणाऱ्या टोळीतील १३ जणांवर पोलीसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली. यामुळे गुन्हेगारी वर्तुळाला नक्कीच हादरा बसला आहे.
पांगरी पोलीसांची १३ जणांवर “मोक्का” कायद्याअंतर्गत धडक कारवाई
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, दि.२३ एप्रिल रोजी ट्रॅक्टर चालक जयसिंग मोहन पवार (वय ३२) व शेतकरी हे पुरीतील शिवारात ट्रॅक्टरने मध्यरात्री नांगरणी करत असताना दरोडेखोरांनी चालकासह शेतमालकाचे धोतराने हातपाय बांधून ट्रॅक्टर, नांगर व मोबाईल चोरून घेवून गेले होते. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी गुन्ह्याचा तपास करुन ०३ आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेले ट्रॅक्टर, नांगरासह दरोडेखोरांनी गुन्ह्यात वापरलेला ट्रक असा एकूण १२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. यातील आरोपींकडे अधिक तपास केला असता आरोपी व त्यांचे इतर साथीदार यांनी आपल्या संघटीत टोळी मार्फत, कधी एकट्याने, संयुक्तपणे किंवा टोळीतील इतर सहकाऱ्यांसह हिंसाचाराचा वापर करून, धमकी देवून, जबरदस्ती करून सोलापूर जिल्ह्यासह औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर, जालना या जिल्ह्यामध्ये गंभीर गुन्हे केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले.