कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : पारधी समाजाची व्यक्ती म्हटलं की गुन्हेगारीचा शिक्का आणि उच्च्भ्रू समाजाची तिरपी नजर कायमचीच. त्याच पारधी समाजात तरूण शिकू लागले आहेत, आपल्या समाजाने शिक्षीत व्हावे, संघटीत व्हावे, आपल्या न्याय हक्कासाठी लढावे म्हणून याच समाजातील काही तरुणांनी पारधी परिवर्तन परिषद ही संघटना सुरू केली. रेणुका मंगल कार्यालय येथे शनिवार (दि.23) रोजी परिवर्तन परिषदेने पारधी समाजाचा ‘परिवर्तन संकल्प’ मेळाव्याचे दोन सत्रात आयोजन केले.
बार्शी येथे पारधी समाजाचा ‘परिवर्तन संकल्प मेळावा’ संपन्न
पहिल्या सत्रात मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी न्यायालयाचे न्यायमूर्ती तेजवंत अँग्रज सिंग सिंधू उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर होते. या कार्यक्रमाला अॅड. अनिल पाटील यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. न्यायमूर्ती सिंधू यांनी पारधी समाजाला मार्गदर्शन केले. याच कार्यक्रमात पारधी समाजातील १० वी,१२ वी, पदवीधर, उच्च शिक्षीत तरूणांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आकाशवाणी सोलापूरचे नितीन बनसोडे यांनी पारधी समाजाच्या अडचणी आणि प्रशासन हा विषय मांडला.
दुसऱ्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर व डॉ. किर्तीपाल गायकवाड उपस्थित होते. या सत्रात तरुणांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आंधळकर यांनी पारधी समाजाला मार्गदर्शन केले. डॉ. गायकवाड यांनी या परिवर्तनाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. “पारधी समाज सुध्दा आज संघटीत होत आहे, मुलं शिक्षण प्रवाहात येत आहेत ही खरचं खुप अभिमानाची गोष्ट आहे “असे उद्गार प्रमुख पाहूण्यांनी काढले.आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेच्या कार्याचा पाहुण्यांनी गौरव केलं .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेखा जाधव यांनी केले तर प्रास्ताविक परिवर्तन परिषदेचे संस्थापक परमेश्वर काळे केले. मनोगत अॅड. ऊषा पवार यांनी व्यक्त केले, आभार बबीता काळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवर्तन परिषदेचे राज्य समन्वयक प्रमोद काळे, आनंद काळे, खंडू काळे, नितीन शिंदे, बापूराव काळे, मिराताई भोसले, सागर पवार, सचिन शिंदे, अमित काळे, महेश भोसले, नंदू शिंदे, शुभम पवार, नंदकुमार पवार व पंपू पवार यांनी परिश्रम केले.