कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद प्रतिनिधी: तालुक्यातील उपळा (मा.) येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती पोलीसांना मिळताच पथकासह ते विवाहस्थळी दाखल झाले. त्यांनी खात्री केली असता, मुलीचे वय १८ पेक्षा कमी असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी वधु-वर पक्षाच्या लोकांचे प्रबोधन केले. तसेच १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच विवाह केला जाईल, असे बंदपत्रही त्यांच्याकडून घेतले.
पोलीसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला
याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या उपळा (मा.) गावात एका अल्पवयीन मुलीचा विवाह १८ जुलै रोजी होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय सुरवसे यांना मिळाली. त्यांनी लागलीच पोलीस उपनिरीक्षक हिना शेख, पोहेकॉ. प्रकाश खंदारे, पोना. राजू माचेवाड, पोकॉ. प्रताप खोसे, जयश्री चव्हाण यांचे पथक उपळा येथे रवाना केले. हे पथक विवाहस्थळी पोहोचल्यानंतर वधू व वराच्या वयाची खात्री केली. त्यावर वधु मुलीचे वय १८ पेक्षा कमी असल्याचे समोर आले. यानंतर पथकाने वधु-वर पक्षासोबतच उपस्थितांचेही समुपदेशन केले. कायद्याचीही त्यांना माहिती देण्यात आली. तसेच १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच मुलीचा विवाह केला जाईल, असे लेखी स्वरूपात बंदपत्र त्यांच्याकडून घेण्यात आले. यानंतर पथक तेथून परतले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे होऊ घातलेला अल्पवयीन बालविवाह टळला.