कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरीतील स्मशानभूमीची दुरावस्था
पांगरी प्रतिनिधी,दि.८ डिसेंबर : पांगरी ता.बार्शी येथील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. स्मशानभूमीतील अंतर्गत रस्ता, बसण्याची जागा, पाणी या मूलभूत सुविधा येथे नसल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सुविधांअभावी स्मशानभूमीच अखेरच्या घटका मोजत असल्याचे नागरिकाचे म्हणणे आहे.
या स्मशानभूमीत येण्यासाठी नीट रस्ता नाही. स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता अद्याप कच्चाच असल्याने पावसाळ्यात तसेच एरवीही या रस्त्याने येताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.अंत्यसंस्कार करण्याकरिता धार्मिक क्रिया पूर्ण करण्यासाठी पाण्याची गरज असते; मात्र, स्मशानभूमीत पाण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे लोकांना अंत्यविधीच्या वेळी स्वत:च लांबून पाणी आणावे लागते. स्मशानभूमीत आल्यानंतर अंत्यविधीच्या वेळी लोकांना बसण्यासाठी कोणत्याही प्रकारची निवाऱ्याची व्यवस्था किंवा ओट्यांची सुविधा नसल्यामुळे अंत्यविधीच्या वेळी नागरिकांना उभेच राहावे लागते. त्याचबरोबर स्मशानभूमीच्या परिसराची सफाईही वेळोवेळी केली जात नसल्याने अनेकदा अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांना त्या ठिकाणी असलेल्या घाणीच्या साम्राज्यातच उभे राहून अंत्यविधीकरण्याची वेळ येते.
“येथील स्मशानभूमीची खूप वाईट दशा आहे.अंत्यसंकार कट्टा हा पूर्ण मोडकीस आलेला आहे.पावसाळ्यात एकापेक्षा जास्त लोकांना देवज्ञा झाल्यास अंतविधी करण्याची अडचण निर्माण होते.ही बाब वेळोवेळी ग्रामपंचायतीच्या लक्षात आणून दिली आहे,पण ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे.” विष्णू (बापू) पवार,जेष्ठ नागरिक