कुतूहल न्यूज नेटवर्क
वाट पाहतोय झंझावाताची,शब्दांच्या तिफनीतून विचार पेरणीची-प्रा.विशाल गरड
गेल्या सात आठ वर्षात व्याख्यानाशिवाय एकही आठवडा खाली गेला नसेल पण लॉकडाऊनमुळे मात्र गेली सात आठ महिने माईकची आणि माझी भेट झाली नाही. तसेही सततच्या व्यस्त वेळापत्रकामुळे वाचनाला पाहिजे तेवढा वेळ मिळत नव्हता पण या लॉकडाऊनच्या काळात खूप काही नविन वाचून आणि लिहून वेळ सार्थकी लावला. स्वतःला आणखीन प्रगल्भ करता आले. माझं चौथं पुस्तक प्रकाशित करून पाचवे पुस्तक लिहून पूर्ण केले. अनेक चित्र रेखाटली व इंगित प्रॉडक्शनच्या माध्यमातून दोन शॉर्टफिल्म निर्माण केल्या. वाड्या वस्त्यापासून अमेरिकेपर्यंत ऑनलाईन व्याख्यानेही दिली परंतू हे सगळं करता करता माझी नजर अजूनही माईकसमोर बसलेल्या गर्दीला शोधत आहे. सभागृहातील भिंती, मैदानातील हवा आणि श्रोत्यांच्या कानावर शब्दांचे पांघरूण घालण्याची वाट पाहतोय. आता अनलॉकच्या प्रक्रियेत बऱ्याच गोष्टी सुरू झाल्या आहेत. राजकीय सभा, सामाजिक कार्यक्रम, किर्तने, सत्कार समारंभ होत आहेत याच पार्श्वभूमीवर सरकारने प्रबोधनाची मशाल पेटवायलाही परवानगी द्यावी हिच विनंती. शब्दांची तिफन खांद्यावर घेऊन विचारपेरणीला आम्ही सज्ज आहोत.
वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड मो. ८८८८५३५२८२