कुतूहल न्यूज नेटवर्क – विजयकुमार मोटे
चार तालुक्यांच्या सीमेवरील वाळुज गावाने घेतला जनता कर्फ्यू चा निर्णय
वाळुज दि.२०: संत रामभाऊ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व बार्शी,उत्तर सोलापूर आणि माढा या तालुक्यांसह मोहोळ तालुक्याच्या सीमेवरील वाळुज (ता. मोहोळ) या गावात २१ जुलै ते २४ जुलै दरम्यान जनता कर्फ्यू असणार आहे. वाळुज मध्ये आज पर्यंत एकूण कोरोना/सारी पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ४ झाली आहे. या ४ ही रुग्णांनी कोरोना/ सारीवर मात केली आहे.
वाळूजमध्ये कोरोनाचा/सारीचा पहिला रुग्ण (सोलापूर येथे उपचारासाठी गेल्यानंतर पॉझिटिव्ह) १९ जून रोजी आढळला होता. त्यानंतरही गावातील ३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.वाळुज गावातील नागरिक बार्शी तालुक्यातील वैराग या गावी शेतीतील अवजारे,खते, बी-बियाणे, बांधकाम साहित्य खरेदी करण्यासाठी जातात. तर कचेरीची व कोर्टाची कामे करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे मोहोळ येथे जातात. शेजारील भैरेवाडी व मनगोळी या गावातील नागरिक वाळूज या गावांमध्ये किराणा बाजार भरण्यासाठी येतात. वाळुज गावातील नागरिक बार्शी,वैराग, मोहोळसह शेजारील देगाव(वा.)या गावांमध्ये वैद्यकीय उपचारासाठी जात असतात. देगाव(वा.) मधील डॉक्टरचाच रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तसेच बार्शी व मोहोळ या दोन्ही शहरांमध्ये कोरोना/सारी रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.
या सर्व बाबी लक्षात घेऊन वाळूज मध्ये पुन्हा कोरोना चा शिरकाव होऊ नये.यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वाळुज ग्रामपंचायतीने तीन दिवस जनता कर्फ्यू चा निर्णय घेतला आहे. वाळुज गावातील नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अन्यथा कारवाई करण्यात येईल असे असे सांगण्यात आले आहे.