कुतूहल न्यूज नेटवर्क
मुंबई: सोलापूर तरुण भारतच्या मुंबई विभाग, मंत्रालय, कोकण विभाग, प.महाराष्ट्र आणि मराठवाडा आवृत्तीच्या मुख्य समूह संपादकपदी राजा माने यांची निवड झाली आहे. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष असलेल्या माने यांच्या कडे डिजिटल आवृत्त्या तसेच सोलापूर तरुण भारत मिडिया लि.च्या वृत्तवेध या चॅनलच्या मुख्य समूह संपादक पदाची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. ते ही जबाबदारी मुंबईतून पार पाडणार आहेत.(Raja Mane as the group editor of Solapur Tarun Bharat)
सोलापूर तरुण भारतच्या समूह संपादकपदी राजा माने
गेली ३७ वर्षे राजा माने हे मराठी वृत्तपत्रसृष्टीत श्रमिक पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. लोकमत, पुढारी, पुण्यनगरी, सुराज्य या दैनिकांमध्ये संपादक, कार्यकारी संपादक, राजकीय संपादक आदी पदांवर त्यांनी आजवर काम केले आहे. ते महाराष्ट्र शासनाच्या पत्रकार अधिस्वीकृती समितीच्या पुणे व कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष राहिले आहेत. राज्य मराठी पत्रकार संघाचे ते माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. तत्कालिन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्यासमवेत त्यांनी ब्रिटन व सायप्रस या देशांचा दौरा केला आहे. तसेच युरोप, अमेरिका, तुर्कस्तान, इंडोनेशिया, दुबई आदी देशांना भेटी दिल्या आहेत. त्यांनी सात पुस्तकांचे लेखन केले आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा पाटील आणि लेक माझी लाडकी ही पुस्तके विशेष उल्लेखनीय आहेत. तर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी लिहिलेले “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..”हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.