बार्शी : सहजीवन संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री यांना आर.टी.ई. प्रवेशाची कोरोना महामारीमुळे मुदत वाढविणेबाबतचे निवेदन तहसिलदार बार्शी यांचे द्वारा देण्यात आले.
आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आर.टी.ई.) मधुन प्रवेश दिला जातो. परंतु, सध्या कोरोना महामारीमुळे अनेक ठिकाणी जनता कफ्यु, लागू असलेले स्थानिक प्रशासनाचे आदेश आणि वाढती रुग्णांची संख्या तसेच आपल्या ऑनलाईन प्रणालीच्या तांत्रीक अडचणी व बंद असणाऱ्या शाळा यामुळे पालकांना ऑनलाईन फॉर्म भरणे अडचणीचे ठरत आहे. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आर.टी.ई. ची प्रवेश संख्या ९६,६८१ असून १,७७,६३२ फॉर्म पालकांनी भरलेले आहेत. त्याप्रमाणे फॉर्म भरण्याची मुदत ही ३० मार्च पर्यंत आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता, ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत ३० एप्रिल पर्यंत वाढवावी. ज्यामुळे जास्तीत जास्त पालकांना पर्यायाने विद्यार्थ्यांना आर.टी.ई चा लाभ मिळेल,असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सदरचे निवेदन नायब तहसिलदार संजीवन मुंढे यांनी स्वीकारले, यावेळी संस्थेचे अध्यक्ष बालाजी डोईफोडे, सचिव ॲड. सुहास कांबळे, पालक अभिजित शिंदे, दत्ता पाटिल, सागर केसरे, रवी चव्हाण आणि किशोर कांबळे आदी उपस्थित होते.