सोलापूर : समाजात शांतता, सुव्यवस्था राहावी, अवैध धंदे, गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान राहिले आहे. वरिष्ठांच्या आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करून बेशिस्तांना शिस्त लावणे आणि गुन्हेगारांमधील माणूस जागा करून त्यांना चांगला नागरिक घडविण्यात पोलिस कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पोलिसांना कर्मचारी नव्हे, तर “अंमलदार’ म्हणा, असे पत्र पोलिस महासंचालकांनी सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढले आहे.
पोलिस ठाण्याबाहेर घडणाऱ्या प्रत्येक हालचालीवर, घडामोडींवर पोलिस कर्मचाऱ्यांची बारीक नजर असते. त्यांची गुन्हेगारांना भीती असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी घटनास्थळी जाऊन पोलिस कर्मचारी काम करतो. सुटी असतानाही काही मोठी घटना घडल्यास ते वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करतात. या पार्श्वभूमीवर अशा पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रोत्साहन वाढावे, पोलिस दलाला त्याचा लाभ होईल, या हेतूने आता त्यांना कर्मचारी नव्हे तर अंमलदार म्हटले जात आहे. सोलापूर ग्रामीण पोलिस दलात दोन हजार ४३० तर शहरात दोन हजारांपर्यंत पोलिस कर्मचारी (अंमलदार) कार्यरत आहेत. अंमलदारच पोलिस दलाचा खरा हिरो असल्याचेही महासंचालकांनी पत्रात नमूद केले आहे.