कुतूहल न्यूज नेटवर्क
नागपूर: हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेला गुगामल वनपरिक्षेत्राचा उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारला अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सशर्त जामीन मंजूर केला आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : अटकेत असलेल्या शिवकुमारला जामीन मंजूर
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार होणाऱ्या जाचाला कंटाळून दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणात विनोद शिवकुमार याला अटक करण्यात आली होती. शिवकुमारने अचलपूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्याचा अर्ज अचलपूर सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यांनतर शिवकुमारने नागपूर खंडपीठात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला होता. अखेर उच्च न्यायालयाने शिवकुमारला जामीन मंजूर केला आहे.
याप्रकरणी न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेत बुधवारी शिवकुमार याला सशर्त जामीन मंजूर केला. हा जामीन मंजूर करताना खंडपीठाने शिवकुमारला दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सदर पोलिस ठाण्यामध्ये हजेरी लावावी, पासपोर्ट जमा करावा आणि न्यायालयाच्या परवानगी शिवाय देशाबाहेर जाऊ नये, अशा अटी घातल्या आहेत.