पंढरपूर : शरद पवार यांची प्रकृती ठीक नाही. त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसारच बाहेर पडावे लागणार आहे. आम्ही त्यांना सांगितलं, की पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाची तुम्ही काळजी करू नका. आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत व मतदारसंघ पवार यांना मानणारे आहेत. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते काम करत आहेत. त्यामुळे प्रकृतीची काळजी घ्या, वैद्यकीय सल्ल्यानुसारच तुम्ही बाहेर पडा. इकडची जबाबदारी आम्ही पार पाडू, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ते जयंत पाटील यांनी शरद पवार यांना दिल्याचे सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जयंत पाटील पंढरपुरात आले. त्या वेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास जाणवत असल्यामुळे 31 मार्चला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे शरद पवार पोटनिवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार नाहीत. याबाबत जयंत म्हणाले, शरद पवार यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सल्ल्याने ते बाहेर पडतील. या मतदारसंघाची काळजी करू नका, असं आम्ही त्यांना सांगितलं आहे.
अर्ज माघारीच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल. सगळ्यांशी चर्चा करूनच भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. वातावरण चांगलं आहे. विजय निश्चित आहे. बंडखोरी झाली असली तरी त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. अर्ज माघारीच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.