सहजीवन सेवाभावी संस्था आणि चर्मकार समाजाची मागणी
कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: कोरोना महामारीमुळे राज्यात लॉकडाऊन आहे, साधारण वर्षभर झाले अशीच परिस्थिती आहे. यादरम्यान मोलमजुरी करणारे आणि छोटे व्यावसायिक यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. चर्मकार समाज आणि चप्पल व्यवसायाशी निगडित लोकांची आर्थिक अडचण वाढत आहे. तसेच सर्वांना चप्पल घालणे गरजेचे असते, गोरगरीब नागरिक तुटलेली चप्पल दुरुस्त करून वापरतात, दुकाने बंद असल्याने काहींना अनवाणी पायांनी चालावे लागते. त्यामुळे कोरोना संसर्ग गरिबांच्या घरापर्यंत पोचण्याची शक्यता वाढत आहे. काही रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्याने चप्पल बुट वापरणे गरजेचे असते. त्यासाठी चप्पल दुरुस्ती व विक्री व्यवसायाचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून दुकाने उघडणे बाबत तात्काळ सुधारित आदेश द्यावेत असे निवेदन बार्शीचे तहसीलदार यांचे माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री यांना तसेच सामाजिक व न्याय मंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यसचिव आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
चप्पल विक्री व दुरुस्ती व्यवसायांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा; मुख्यमंत्री यांना निवेदन
सदरचे निवेदन नायब तहसिलदार संजीवन मुंढे यांनी स्वीकारले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुहास कांबळे, बालाजी डोईफोडे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे गटई कामगार शहराध्यक्ष रोहिदास व्हनकळस, प्रमोद (आबा) सोनवणे, राष्ट्रीय रविदास विद्यार्थी परिषद सोलापूर जिल्हा अध्यक्ष आकाश पांडुरंग दळवी, रोहिदास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामा कबाडे, गणेश कबाडे, धुंडाप्पा कबाडे, प्रकाश कबाडे, नागनाथ कबाडे, शिवाप्पा कबाडे आदी चर्मकार समाज बांधव व्यावसायिक उपस्थित होते.