कुतूहल न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राजा माने
शून्यातून विश्व निर्माण करणारा, हाडाचा संवेदनशील चित्रकाराची टीमही त्याच संवेदनशिलतेत कशी समरस होते याची साक्ष नंदूरबारचे जिल्हा पोलिस अधीक्षक चित्रकार पी.आर.पाटील यांच्या टीमने एका चिमुकलीच्या जीवनात प्रकाश पाडून दिली. पोलीस म्हटले की संवेदना नसलेला घटक असा सर्वत्र समज आहे. पण नंदुरबार पोलीसांनी हा समज खोटा ठरविला आहे. १० वर्षांची मुलगी संगीता राजू वळवी दि. १९ सप्टेंबर रोजी नंदुरबार मधून हरवली. ती तशी अनाथ! तिला आई वडील नाहीत परंतु ती तिच्या चुलत बहिणीकडे रहाते. त्या चुलत बहिणीलाही १० महिन्यांची एक मुलगी असून नवरा वारलेला. त्यामुळे तिचीच परिस्थिती बेताची. ती संगीताकडे कसे लक्ष देणार? नंदुरबारचे नूतन पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक विजय पवार व उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांना पुढे काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सदर मुलीस शोधण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे सचिन हिरे यांनी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण खेडकर यांना बोलावून त्या मुलीचा शोध घेण्यासाठी तात्काळ सहा. पोलिस निरीक्षक नंदा पाटील यांचे पथक रवाना केले.
नंदुरबार पोलीसांचे सामाजिक भान.. टीम पी.आर.पाटलांची संवेदनशील कामगिरी!

नंदा पाटील यांनी तत्परता दाखवत त्या मुलीच्या नातेवाईकांना गाडीत सोबत घेतले व गांभिर्य ओळखून अवघ्या २४ तासात त्या मुलीला शोधून काढले. तिला चुलत बहिण वगळता जवळचे कोणीच नसल्याने ती सापडल्याचा आनंद पोलीस वगळता कोणाला होणार?, पोलीस अधीक्षक पाटील यांनी या सर्व टीमचे कौतुक केलेच परंतु त्या गरीब, आदिवासी व अनाथ मुलीला नवीन कपडे घेऊन दिले. पोलीस निरीक्षक किरण खेडकर यांनी आणखी पुढाकार घेतला आणि त्या मुलीचे परिस्थितीमुळे थांबलेले शिक्षण सुरु करण्याचा निर्णय घेतला. आता संगीता पुन्हा शाळेत जाणार आहे. पोलीस निरीक्षक किरण खेडकर यांच्या पुढाकाराने तिच्या शिक्षणाचा खर्च नंदुरबार पोलीस उचलणार आहेत. नूतन पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी तसे जाहिर केले. पोलीस अधीक्षक पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, सचिन हिरे, पोलीस निरीक्षक किरण खेडकर व सपोनि नंदा पाटील यांचेसह नंदुरबार पोलीसांच्या या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount