मोहोळ : बेजबाबदारपणे वाहन चालवून स्वतःबरोबरच इतरांचा जीव धोक्यात घालू नका, तुमच्या छोट्या चुकीची मोठी किंमत संपूर्ण कुटुंबाला भोगावी लागू नये, याचे भान ठेवून वाहन चालवा, असा भावनिक सल्ला देत जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी वटवटे (ता.मोहोळ) येथे दिला.
‘तुमच्या चुकीची किंमत कुटुंबाला भोगावी लागेल’ पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे आवाहन
येथील जकराया साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित सोलापूर ग्रामीण पोलिस दल जिल्हा वाहतूक शाखा व कामती पोलिस ठाण्याच्यावतीने ‘जिल्ह्यातील पहिल्या’ ऊस वाहतूक चालक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जकराया कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष ऍड. बी. बी. जाधव होते. जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने, प्रादेशिक परिवहन विभागाचे सतिश जाधव, मोटार वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ, शुभम ठोमरे, जकरायाचे कार्यकारी संचालक सचिन जाधव, तज्ञ संचालक राहुल जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी पोलिस अधीक्षक सातपुते म्हणाल्या, खून असो वा अपघात या दोन्हीही घटनेत जीवच गमवावा लागतो. परंतु अपघात रोखता येवू शकतात. तरीही अपघाताकडे दुर्लक्ष व खुनासारख्या घटनाकडे गांभीर्याने पाहिले जाते, हे दुर्दैवी आहे. अपघाती मृत्यूनंतर आपल्या उघड्यावर येणाऱ्या कुटूंबीयाच्या वेदना वाहन चालकांनी समजून घ्या. यासाठी काळजीपूर्वक वाहन चालवून होणाऱ्या अपघात व मृत्यूपासून स्वतःला वाचवा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक कोकणे म्हणाले, ऊस वाहतूकदारांनी मद्यपान करून बेजबाबदारपणे वाहन चालविणे, मोठया व कर्कश आवाजात टेपरेकॉर्डर लावणे, रिपलेक्टरचा वापर न करणे, क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक,अतिवेग व अनियंत्रित वाहन चालविणे या सर्व गोष्टी नियमबाह्य व अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या आहेत. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहन चालकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा दिला.
‘वाहन चालविताना ताशी दहा किलोमीटर वेगमर्यादा ठेवावी, प्रवासा दरम्यान अचानक वाहन नादुरुस्त झाल्यास शक्यतो रस्त्याच्या बाजूला घ्यावे, मोबाईल हेडफोन वा कर्णकर्कश आवाजात गाणी वाजविणे, या सर्व बाबी अपघाताला निमंत्रण देणाऱ्या आहेत. यासाठी वाहन चालकांनी काळजी घ्यावी. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असल्याचा इशारा कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माने यांनी दिला.
यावेळी परिवहन अधिकारी सतीश जाधव यांनी वाहतूकीचे नियम, अपघाताची करणे व पर्याय याविषयी माहिती दिली. कारखान्याचे अध्यक्ष ऍड.बी.बी.जाधव यांनी कायदा म्हणूनच नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व वाहनांना सुरक्षितेच्यादृष्टीने आवश्यक साहित्य कारखान्याकडून उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले. यावेळी कार्यकारी संचालक सचिन जाधव, परिवहन विभागाचे तानाजी धुमाळ, शुभम ठोमरे यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थिताच्या हस्ते ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले.
यावेळी एकनाथ वाघमारे, नागराज पाटील, कामती पोलिस ठाण्याचे अंबादास दुधे, अमोल नायकोडे, संदीप काळे, नागनाथ कुंभार, सुनील पवार, रविंद्र बाबर, जकरायाचे प्रशासन अधिकारी जकराया वाघमारे, शेती विभागाचे विजयकुमार महाजन, नानासाहेब बाबर मोठया संख्येने वाहन मालक, चालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रम संचालक सचिन जाधव यांनी केले. पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सूत्रसंचालन केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी आभार मानले.