कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : हॅलो, सर कोविड प्लाझ्मा हवाय असे अनेक फोन बार्शीतील श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी येथे खणखणत आहेत. एकीकडे रुग्णालयात बेड, रमेडीसीवीर इंजेक्शनची कमरता जाणवत आहे. तर, दुसरीकडे रक्त बाटल्या अन् प्लाझ्माचीही तीच परिस्थिती आहे. त्यामुळेच, डोनरने पुढे येऊन प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक डॉक्टर्सं सातत्याने करत आहे. बार्शीतील सृष्टी तम्मेवार हिने कोरोनाच्या कठीणप्रसंगात आपली पॉझिटीव्ह दृष्टी समाजाला दाखवून दिलीय.
बार्शीतील सृष्टीने कोरोना महामारीत दुसऱ्यांदा केलं प्लाझ्मा दान
शहरातील भोसले चौक येथील रहिवाशी असलेली सृष्टी सुधीर तम्मेवार या तरुणीने दुसऱ्यांदा प्लाझ्मा दान केले. आपल्यातील धाडसी बाणा दाखवून तिने कोरोनाच्या लढाईत दोन जीव वाचविण्यासाठी पुढाकार घेतला. सृष्टीला सप्टेंबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिने उपचार घेत कोरोनावर मात केली. कोरोनावर मात केल्यानंतर, आता आपण एखादा जीव वाचविण्याच्या कामी येऊ शकतो, हे समजताच तिने ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदा प्लाझ्मा दान केले. सृष्टीने शहरातील श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीत जाऊन अँटीबॉडीज चेक केल्यानंतर पहिला प्लाझा डोनेट केला. विशेष म्हणजे एका प्लाझ्मा डोनेटवर न थांबवता, तिने एका रुग्णाला तातडीचा प्लाझ्मा आवश्यक असल्याचे समजाच, आज दुसऱ्यांदा प्लाझ्मा डोनेट केला आहे. सृष्टीच्या या धाडसी बाण्याचे सामाजिक कार्यकर्ते अजित कुंकूलोळ आणि पत्रकार संतोष सूर्यवंशी यांनी कौतुक केले.
गतवर्षी 12 वी पास झालेल्या सृष्टीने आपल्या कृतीतून जगण्याची सकारात्मक दृष्टीच दाखवून दिलीय. कोरोना संकटातही पॉझिटीव्ह विचारातून मदतीचा भाव तिनं जपलाय. विशेष म्हणजे सृष्टीचे वडिल सुधीर तम्मेवार हेही शतकवीर डोनर आहेत. सुधीर तम्मेवार यांनी 100 वेळा रक्तदान केले असून 50 पेक्षा अधिकवेळा प्लेट्सलेट डोनेट केलंय. त्यामुळे, वडिलांपासूनच दानशूरतेची भावना तम्मेवार कुटुंबीयांमध्ये रुजल्याचं सृष्टीनं बोलताना सांगितलं. तसेच, कोरोना महामारीच्या काळात आपण एखादा जीव वाचविण्याच्या कामी येतो, यापेक्षा मोठे पुण्य काय?. मी प्लाझ्मा डोनेट केल्याचा मलाच सर्वाधिक आनंद असल्याचे सृष्टीने म्हटले. तर, कोरोनावर मात केलेल्यांनी निडर होऊन प्लाझ्मा दान करावे, असे आवाहनही सृष्टीने केले आहे.