वाघोली-राहू रस्त्यावर एस.टी. बस व चारचाकीची धडक; महिला चालकाविरोधात गुन्हा, रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी तीव्र
कुतूहल मीडिया ग्रुप
पुणे: लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली-राहू रोडवरील मावी टॉवर जवळ रविवार दि. २२ रोजी सकाळी १० वाजता एस.टी. बस आणि चारचाकी वाहन यांच्यात अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे पुढील बंपरचे नुकसान झाले असून, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले.
एस.टी. महामंडळाचे चालक चंद्रकांत यंकटराव आंधळे (वय ४०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पुणे स्टेशन येथून वाळुंजकडे जात असताना (बस क्रमांक एम.एच.०६ एस ८३४३), वाघोलीजवळ मावी टॉवर समोरील रस्त्यावर भरधाव वेगात आलेल्या टोयोटा इटिओस (एम.एच.१२ एन.पी.७७४०) या चारचाकीने ओव्हरटेक करत अचानक डाव्या बाजूस वळण घेतले. यामुळे बसला धडक बसून ती रस्त्याच्या कडेला गेली. प्रवाशांना तत्काळ सुरक्षित खाली उतरवण्यात आले.
चौकशीतून समोर आले की, सदर चारचाकी वाहन पालवी संजय भोसले (वय ४७, रा. कवडनेगर, पुणे) यांच्या मालकीचे असून त्या स्वतः ते वाहन चालवत होत्या.
या प्रकरणी पालवी भोसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार प्रताप देवकर हे पोलीस निरीक्षक सरजेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी तीव्र
या अपघातामुळे वाघोली-राहू रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. या रस्त्याची रुंदी मर्यादित असल्यामुळे याआधीही अनेक अपघात घडले असून, वाहनांची वाढती संख्या आणि अरुंद रस्ता ही समस्या गंभीर बनली आहे.
वाडेबोल्हाई ग्रामस्थांच्या वतीने शासन आणि संबंधित विभागांकडे या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण व नूतनीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा प्रश्न प्राधान्याने सोडवावा, असे आवाहनही ग्रामस्थांनी केले आहे.