२२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोंबर पर्यंत राहणार मोहिम
एसटी महामंडळाकडून विना तिकीट प्रवास तपासणी मोहिम सुरु
कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहकाकडून तिकीट विक्रीद्वारे मिळणारे उत्पन्न हे महामंडळाचे कायदेशीर उत्पन्न आहे. या उत्पन्नाला गळती लागू नये व महामंडळ आपल्या उत्पन्नापासून वंचित होऊ नये म्हणून मार्गावरील कामगिरी करणाऱ्या सर्व वाहकांची तपासणी करणेकरिता रा. प. बार्शी आगाराच्या वतीने मार्ग तपासणी पथके तयार करण्यात आली आहेत.

त्यामध्ये रा.प.म.च्या प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये या बाबींना आळा घालण्यासाठी दि. २२/०९/२०२१ ते ६/१०/२०२१ (पंधरवडा मोहीम) प्रवासी तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
तरी रा. प. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विना तिकीट प्रवास करू नये. आपली तिकिटे प्रवास पूर्ण होईपर्यंत जपून ठेवावीत तसेच मोटार वाहन कायदा १९८८ नुसार विनातिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडून त्याने चुकविलेल्या प्रवास भाड्याच्या व्यतिरिक्त प्रवास दुप्पट भाडे किंवा रक्कम रु. १०० यापैकी जी रक्कम अधिक असेल ती रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रमुख मोहन वाकळे व स्थानक प्रमुख स्मिता मिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.