कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: रेमडेसिवीर इंजेक्शनचा कोव्हिड सेंटर सोडून इतर मेडिकल आणि मेडिकल एजन्सीमधील काळाबाजार थांबवावा अन्यथा येत्या गुरूवार दि. 22 एप्रिल पासून बार्शी तहसीलसमोर उपोषण करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा पत्रकार विवेक गजशिव यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गत काही दिवसांपासून कोरोनासाठी वरदान ठरलेल्या रेमडेसीवीर औषधाचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात चालला आहे. बार्शीतील एका मेडिकलवर कारवाई देखील करण्यात आली आहे. शहराबरोबर तालुक्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यात लॉकडाउन असल्यामुळे लोकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. लोकांकडे दोन वेळचे जेवण करण्यासाठी पैसे नाहीत अशात त्या व्यक्तींना कोरोना झाला तर साठेबाजी केलेल्या आणि रेमडेसिवीर औषध विकायची परवानगी नसलेल्या मेडिकल चढ्या भावाने पाच ते सहा हजार किंमतीने विकत आहेत. अशा मेडिकल आणि एजन्सीवर छापे मारून त्यांचा परवाना रद्द करावा. जिल्हाधिकारी यांच्या नियमानुसार कोव्हिड सेंटर असेल तिथेच रेमडेसिवीर औषध विकायची परवानगी असताना इतर मेडिकल आणि एजन्सीमध्ये औषध जातेच कसे ? यामध्ये कोणाचे अर्थपूर्ण संबंध दडले आहेत याचा शोध घेऊन संबधितांवर कारवाई करून बार्शी तालुक्यासाठी रेमडेसिवीरचा पुरवठा वाढवण्यात यावा.