कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: आदर्श कन्या, कर्तबगार पत्नी, पराक्रमी माता, प्रेरणादायी आजी अशा विविध आघाड्यांवरील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणाऱ्या राजमाता जिजाऊंचा आदर्श महिलांनी घ्यावा, असे आवाहन शिक्षण सेवा मंडळाच्या संचालिका प्रा. रुपाली नारकर यांनी विद्यार्थिनींना केले. पांगरीतील सर्वोदय विद्या मंदिर प्रशलेत लायन्स क्लब बार्शी चेतनाच्या वतीने महिला दिनाच्या औचित्याने किशोरवयीन मुलींसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी लायन्स क्लब बार्शी चेतनाच्या अध्यक्षा ईश्वरी जोशी, सचिव संतोष जोशी, पत्रकार सचिन ठोंबरे, मुख्याध्यापिका वर्षा कौलगुड, सहशिक्षिका शिंदे, पंडीत, सहशिक्षिका कौशल्या माळी उपस्थित होत्या.
विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊंचा आदर्श घ्यावा : प्रा. रुपाली नारकर
पुढे बोलताना नारकर म्हणाल्या की, राजमाता जिजाऊ यांनी जाधव घराण्याची आदर्श कन्या, छत्रपती शहाजीराजेंची कर्तबगार पत्नी, छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा घडविणारी पराक्रमी माता आणि छत्रपती संभाजी महाराजांची जडणघडण करणारी प्रेरणादायी आजी या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. त्याचा आदर्श प्रत्येकीनेच घ्यायला हवा.
यावेळी ईश्वरी जोशी यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन करताना सांगितले की, किशोरवयीन मुलींच्या वयात येतानाच्या शारीरिक, मानसिक बदलांना कसे स्वीकारायला पाहिजे? याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या वयात मुलींच्या मासिक चक्राची सुरुवात होताना बऱ्याचदा शारीरिक आरोग्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्या विषयावर मोकळेपणाने बोललेही जात नाही. विशेतः ग्रामीण भागातील मुली याविषयी दबून वागतात. त्याचबरोबर मानसिक परिणामाबद्दलही जागृत नसतात. या संदर्भात मुलींनी आपल्या शारीरिक मानसिक तसेच बौद्धिक आरोग्याची काळजी घ्यावी, स्त्रीला मिळालेली एक खूप मोठी नैसर्गिक सृजनात्मक शक्ती आहे. या स्त्रीत्वाकडे खूप सकारात्मक बघावे व त्याला एक सृजनात्मक आनंदाने स्वीकारावे. त्यासाठी स्वतःवर आधी प्रेम करायला शिकलं पाहिजे. मासिक पाळीच्या काळात आरोग्याची विशेष काळजी घेऊन जुन्या पारंपरिक पद्धतीपेक्षा सॅनिटरी नॅपकिन वापरण्यासाठीचेही मार्गदर्शन करण्यात आले. या शिवाय सायबर क्राईमच्या वाढत्या प्रमाणामुळे या वयातील मुलींनी कशापद्धतीने सोशल नेटवर्कचा वापर करावा यावरही मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी चेतना क्लबच्या वतीने मुलींना सॅनिटरी नॅपकिन वाटण्यात आले.