fbpx

ध्रुवताऱ्याचा आदर्श घ्या आणि त्यासारखे चमका- न्यायाधीश तेजवंतसिंघ संधू

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: ध्रुवताऱ्याचा आदर्श घ्या आणि त्यासारखे चमका असे प्रतिपादन न्यायाधीश तेजवंतसिंघ संधू यांनी जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रमात केले. भारत सरकार नेहरू युवा केंद्र सोलापूर, क्रांती बहुद्देशीय संस्था व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील संत तुकाराम सभाग्रहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Take the example of the pole star and shine like it – Judge Tejwant Singh Sandhu)

पुढे बोलताना न्यायाधीश संधू म्हणाले, ध्रुवताऱ्या सारखे चमकण्यासाठी काही गोष्टींचे अनुकरण आपण केले पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या बोलण्यामध्ये गोडवा असला पाहिजे, नम्रता, आदर, इतरांना शुभेच्छा देणे, इतरांची काळजी घेणे आणि सर्वांशी प्रेमाने वागणे या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपल्या विचारावर लक्ष असले पाहिजे, बोलताना शब्दावर लक्ष असले पाहिजे, आपले कर्म ही तेवढीच प्रामाणिक असले पाहिजेत आणि स्वतः मधले गुण ओळखून वेळेचे बंधन पाळणे पाहिजे. यशस्वी होण्यासाठी सकारात्मक उद्देश ठेवून सकारात्मक मार्ग निवडला तर नक्कीच आपण ध्रुव ताऱ्यासारखे चमकल्या शिवाय राहणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे होते. स्मार्ट अकॅडमीचे संचालक सचिन वायकुळे, जिल्हा युवा अधिकारी अजितकुमार, क्रांती बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष धिरज शेळके, सुभाष चव्हाण, चांदमल ज्वेलर्सचे शशांक गुगळे, मुक्ताई डिजिटलचे आदेश शिंदे, श्री करिअर अकॅडमीचे उदय शिंदे, मिथलेश दीक्षित आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी किल्ला जिंकला, संत ज्ञानेश्वरांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, त्यांचा आदर्श घेऊन आपणही योग्य वयामध्ये आणि योग्य वेळेमध्ये योग्य मार्गदर्शन घेऊन योग्य करिअरला सुरुवात करणे गरजेचे आहे. यामध्ये योग्य मार्ग निवडला आणि उंचीचे स्वप्न बघितले तर यश नक्कीच तुमच्या पाठीशी आल्याशिवाय राहणार नाही. व्हॅलेंटाईन डे ला गुलाब देण्यापेक्षा एकदा आई-वडिलांकडे आणि त्यांच्या कष्टाकडे बघा, चिकित्सक पद्धतीने संधीचे सोने करत, शालेय शिक्षणाबरोबर इतर शिक्षण घेऊन योग्य निवडीने यशाच्या शिखरापर्यंत आपण पोहोचू शकता. त्यासाठी माणूस म्हणून अगोदर स्वतःवर प्रेम करायला शिका असे प्रतिपादन स्मार्ट अकॅडमीचे संचालक सचिन वायकुळे यांनी केले.

तर महिला सबलीकरण या विषयावर बोलताना, महिला सबलीकरण करील तो खरा नाथ! कायदा सुव्यवस्था राखण्या देऊनी साथ! स्वयंरोजगार करण्या समर्थ होऊ दे हाथ! अशा काव्यपंक्तीनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे यांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी अजितकुमार यांनी केले तर सूत्रसंचालन धिरज शेळके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *