fbpx

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी बार्शीचे तहसीलदार थेट बांधावर

कुतूहल न्यूज नेटवर्क 
बार्शी:
बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखाने यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून, अडचणी निर्माण झालेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बार्शी उत्तरेकडील आगळगाव, बेलगाव आदी ठिकाणी नुकताच स्थळ पाहणी दौरा केला आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्यांना आपापल्या शेतात जाण्यासाठी हक्काचा वहिवाटीचा रस्ता मिळणे हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे.

ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्त्याच्या अडचणी दिसून येत आहेत. शेतात जाण्यासाठी रस्ताच नसेल तर शेतकऱ्यांनी आपल्या शेताची मशागत करून, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा हा मोठा प्रश्न काही शेतकऱ्यांना बऱ्याचदा सतावत असताना दिसत आहे. काही शेतकऱ्यांचा चालू वहिवाटचा रस्ता अडविल्याचा असाच एक प्रकार बार्शी तालुक्यातील मौजे बेलगाव येथे समोर आला आहे. पूर्वीपासून वर्षानुवर्षे चालू वहिवाटीचा गट नंबर 174,175,178,180 व 186 मध्ये शेतात जाण्यासाठीचा रस्ता गट नंबर 280,176,181 व 185 मध्ये, सदरील चालू वहिवाटीच्या रस्त्यामध्ये जेसीबीच्या साहाय्याने चारी खोदून आणि दगडगोटे टाकून अडथळा निर्माण केल्याने संबंधित शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे  धाव घेऊन सदरील रस्त्यावर केलेला अडथळा दूर करून, शेतात ये- जा करण्यासाठी पूर्ववत रस्ता मिळण्यासाठी रीतसर मागणी केली होती.

दरम्यान बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखाने यांनी गावदौरा घेऊन सदरील ठिकाणी पाहणी केली असता वरीलप्रमाणे अडथळा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी तहसीलदार सुनील शेरखाने यांनी सदरील ठिकाणच्या रस्त्याची पाहणी करून सर्कल मुंढे यांना स्थळ पाहणी पंचनामा करण्याचे आदेश देऊन 16 जुलै रोजी सुनावणीचे आदेश दिलेले आहेत. तहसिदारांच्या पाहणी दौऱ्यामुळे अडचण निर्माण झालेल्या शेतकऱ्यांना तूर्तास तरी दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे. स्थळ पाहणीसाठी आलेले तहसीलदार सुनील शेरखाने यांच्या सोबत सर्कल मुंढे, तलाठी मनगिरे, वादी, प्रतिवादी आणि गावातील व शेजारील शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *