मंगळवेढा प्रतिनिधी : कुतूहल न्यूज नेटवर्क
मासे पकडण्यासाठी गेलेला अभियंता पाण्यात गेला वाहून
मंगळवेढा दि.०२ : मंगळवेढा तालुक्यातील ममदाबाद हु.वरून शिरनांदगी तलावाकडे जाणाऱ्या ओढ्यात मासे धरण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे २० वर्षीय उच्चशिक्षित अभियंता तरुण अनिल जगन्नाथ इंगोले वाहून गेल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद हु येथे घडली आहे. पाण्यात वाहून जाण्याची या पंधरवड्यातील तालुक्यातील तिसरी घटना आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, महमदाबाद परिसरात असणारे सिमेंट बंधारे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या म्हैसाळच्या पाण्याने तुडुंब भरले आहेत, अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांत जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे हे ओढे भरून वाहू लागले आहेत. वाहत्या पाण्यात मासे पकडण्यासाठी तिघेजण गेले होते. पण वेगात वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनिल हा युवक वाहून गेला.शंकर क्षीरसागर याने इतर दोघांना वाचविले. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली असून उपस्थित नातेवाइकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी सायंकाळच्या वेळी अंधारात शोधकार्य करण्यास अडथळा येत असल्यामुळे आपत्कालीन पथकाला पाचारण केले होते.