कुतूहल न्युज नेटवर्क
राज्यपालांच्या पत्राची भाषा अयोग्य, शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्र !
मुंबई,दि.१३ (प्रतिनिधी) मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रातील भाषेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून राज्यपाल पदावरील व्यक्तीची भूमिका खेदजनक असल्याचे पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री संघर्षात उतरत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जोरदार पाठराखन केली. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातील भाषा व मजकुराबाबत तीव्र नापसंती व्यक्त करताना पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कोणत्याही विषयावर राज्यपालांची स्वतंत्र मते असू शकतात.त्यांचे म्हणणे,मत व भूमिका मुख्यमंत्र्यांना कळविणे हा राज्यपालांचा अधिकार असतो हे देखील मला मान्य आहे. राज्यपाल व सरकारमध्ये मुक्त संवाद असला पाहिजे. पण राज्यपालांनी मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र, त्यातील भाषा आणि ते पत्र थेट प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचणे धक्कादायक आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राची प्रतही पवार यांनी आपल्या पत्रासोबत जोडली असून त्यातील आक्षेपार्ह विधाने उद्धृत केली आहेत. ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द घटनेच्या प्रस्तावनेत असून त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर आहे. याबाबत राज्यपालांनी केलेले भाष्य पवार यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणले आहे.
महाराष्ट्रात मोठया प्रमाणात प्रार्थनास्थळे आहेत.त्यातील अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात भाविक एकवटत असतात.मुंबईतील सिदधीविनायक मंदिर असो,पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर वा शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर येथे तसेच इतरही अनेक धार्मिक स्थळांवर सर्वसाधारण दिवशीही सर्वधर्मिय भाविक एकवटत असतात.हीच बाब लक्षात घेउन राज्य सरकारने अदयाप प्रार्थनास्थळे उघडलेली नाहीत.तुम्हीच दो गज की दुरी हे घोषवाक्य दिलेत.महाराष्ट्र सरकारही माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून त्याच प्रकारे लोकजागृती करत आहे असेही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.