fbpx

सेक्सटॉर्शनपासून जनतेने सावध रहावे; पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन

कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्याचा सेक्सटॉर्शन हा नवीन प्रकार सामाजिक प्रसारमाध्यमाच्या अविवेकी वापरामुळे उदयास आला आहे. या प्रकरणात अज्ञात स्त्री-पुरुष खंडणी उकळण्या करिता नवनवीन सावज शोधण्यासाठी ऑनलाईन सामाजिक प्रसार माध्यमाचा उपयोग करतात. त्यामुळे असे प्रकार घडू नयेत यासाठी जनतेने सावध राहावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी केले आहे.

सेक्सटॉर्शन करणारी व्यक्ती फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप यासारख्या मेसेजिंग ॲप, डेटिंग ॲप यासारख्या सामाजिक प्रसारमाध्यमात खोटे नाव, पत्ते, छायाचित्रे वापरून आपले बनावट खाते उघडून आपण उच्च पदस्थ, श्रीमंत ,देखणे, सुंदर असल्याचा बनाव करतात. बनावट खात्याद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून, मिस कॉल देऊन, व्हिडिओ कॉल करून प्रेम, विवाह, संभोग असे भुरळ पाडणारे प्रस्ताव इतरांना पाठवून त्यांची मैत्री संपादित करतात.

या मैत्रीतून पुढे अर्धनग्न, नग्न अवस्थेत एकमेकांना व्हिडिओ कॉल चॅटींग केले जाते. बनावट खातेदार असे अर्धनग्न, नग्न, व्हिडिओ कॉल, छायाचित्रे अश्लील संभाषण-संदेश जतन करून ठेवतात. कालांतराने त्यात रेकॉर्डिंग च्या आधारे ते व्हिडिओ कॉल, छायाचित्रे, चॅटिंग अशी खाजगी माहिती इंटरनेटवर जाहीर करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करतात आणि ऑनलाईन खंडणी उकळतात.

दुसऱ्या प्रकारात ऑनलाइन अश्लील साहित्य दाखवणाऱ्या संकेतस्थळाचे सदस्य असणारे ग्राहक आपली नावे, बँक खाते विषयक माहिती या ठिकाणी भरतात. त्यामुळे ज्ञात-अज्ञात व्यक्तीशी चॅटिंग करू नये, अश्लील छायाचित्रे पाठवू नये, अश्लील व्हिडिओ कॉल करू नये, आपली खासगी छायाचित्रे, व्हिडिओ हे मोबाईल फोन, मेमरी कार्ड, ऑनलाइन ड्राईव्ह मध्ये जतन करताना अधिकृत ॲप व मजबूत पासवर्डचा वापर करावा. सामाजिक प्रसार माध्यमांचा मर्यादित व सुरक्षित वापर करावा. असे आवाहन पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *