कुतूहल न्यूज नेटवर्क
पी.एस.पैकीकर कन्सट्रक्शन कपंनीचा बार्शी नगरपालिकेच्या तिजोरीवर दरोडा -राजेंद्र मिरगणे
बार्शी : नगरपालिकेच्या वतीने पी.एस.पैकीकर कन्सट्रक्शन कंपनीकडून होणारी रस्त्यांची कामे अंत्यत निकृष्ट दर्जाची असून नगरअभियंता व अभियंता यांनी कंत्राटदाराबरोबर संगणमत करून पालिकेचे व पर्यायाने करदात्या बाशीकरांचे मोठे नुकसान करून त्यांच्या खिश्याला भुर्दंड बसवून पालिकेच्या तिजोरीवर दरोडा घातल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
यावेळी मिरगणे म्हणाले, रस्ते हे जीवन वाहिण्या असतात. रस्त्यांवर ये – जा करणारे पादचारी व संपुर्ण वाहतूक व्यवस्थेला दळणवळणासाठी चांगल्या रस्त्यांची गरज असते. त्यामुळे रस्ते बांधणीची कामे होताना गुणवत्ता नियंत्रण असलेच पाहिजे. पण शहराच्या विविध भागातील रस्ते हे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून या कामांकडे नगराध्यक्ष, सत्ताधारी, मुख्याधिकारी, नगरअभियंता, स्थापत्य अभियंता यासर्वांचेच पुरणपणे अर्थपुर्ण व हेतुपुरस्सर दुर्लक्ष आहे. रस्त्यांची कामेही निकृष्ट दर्जाची करण्यामध्ये भ्रष्टाचाराची मोठी साखळी कार्यरत आहे. रस्त्यांच्या कामांमध्ये अनेक गंभीर गैरप्रकार घडत आहेत.
यावेळी निकृष्ट रस्त्यांची उदाहरणे देताना मिरगणे म्हणाले, बाळेश्वर नाका ते बारबोले वस्ती (फेज-१ कुर्डुवाडी रमाई चौक ते काझी प्लॉट चेनेज 0.00 ते ६०२.00 मी.) या रस्त्याचे काम पी. एस.पैकीकर कन्सट्रक्शन कंपनीने नुकतेच पुर्ण केले आहे. या भागातील नागरिकांच्या तक्रारी आल्यामुळे मी या कामाची पाहणी केली तेंव्हा अतिशय संतापजनक प्रकार उघडकीस आला. या काँक्रीट रस्त्यास ३ इंच ते ४ इंच रुंदीच्या व १०० फुट ते १५० फुट लांबीच्या भेगा पडल्या आहेत. या भेगांमध्ये डांबर भरून तात्पुरती डागडूजी केल्याचे स्पष्ट दिसते. परंतू अशाप्रकरे काँक्रीट रस्त्याची डागडूजी होत नसते. त्यामुळे या रस्त्याचे आर्युमान निविदेप्रमाणे काम पुर्ण होऊन निविदा अंतिम होण्यापेक्षाही कमी आहे. त्यामुळे बार्शीकरांचे दोन्ही कामे मिळून ५ ते ६ कोटी मातीत गेले आहेत. तसेच निविदेमध्ये अर्थवर्क साठी तसेच डब्लू बी.एम. खाली वापरावयाच्या मुरूमासाठी ५ कि.मी. ची लीड दिलेली असतानाही साईड ड्रेन मध्ये जागेवरच निघालेली काळी माती वापरण्यात आलेली आहे. त्यामुळेच काँक्रीट रस्त्यास मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत. काँक्रीटसाठी वाळूऐवजी वापरणेत आलेली क्रश सँण्ड मध्ये जास्तीत जास्त ७ ते ८% पर्यंत डस्टची मुभा असताना २५ ते ३0 % एवढे डस्टचे प्रमाण असल्याचे दिसते. त्यामुळे काँक्रीटचा दर्जा खूपच खालावला असून त्यास मोठ मोठ्या भेगा रस्त्याचे आयुष्य सुरू होण्यापुर्वीच संपले आहे. तसेच या अतिरिक्त धुळीकणमुळे हे कण कॉक्रीटपासून अलग होउन हवेत होणाऱ्या प्रदुषणामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नागरीकांना फुफुसाचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला असून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तर हे अत्यंत भयंकर ठरणार आहे. या कामांची मोजमापे (अर्थवर्क, ग्रन्यलर सब ग्रेड, डब्लू बी.एम. सी.सी., सबबेस सी.सी., एम-३० ट्रिमिक्स) या कामांची जाडी अंदाजपत्रकापेक्षा कमी करणेत आली असतानाही अधिकारी व कंत्राटदार यांनी संगनमताने अंदाजपत्रकाप्रमाणे देयक देऊन न.पा. व नागरीकांचे खिश्याला भुर्दंड बसविला आहे. त्यामुळे सदर कंत्राट कामाची चौकशी करून कंत्राटदाराकडून देयक वसुल करणे गरजेचे आहे. कंत्राटदाराकडून पुन्हा उच्च गुणवत्तेचे काम करून घेणे गरजेचे आहे. तसेच तत्कालीन नगरअभियंता व स्थापत्य अभियंत्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.
हाच गैरप्रकार याच पी.एस.पैकीकर कन्सट्रक्शन कंपनीकडून पुन्हा सुरू असल्याचे सांगून मिरगणे म्हणाले, आता हि कंपनी बारबोले वस्ती ते कासारखाडी रस्ता ( फेज- ४ धर्माधिकारी प्लॉट ते रेल्वे लाईनकडे चेनेज १८०६.०० ते २००१.00 मी.) पर्यंतच्या रस्त्याचे काम करत आहे. या कामाच्या निविदेमध्ये देखील अर्थवर्कसाठी तसेच डब्लू.बी.एम. साठी वापरावयाच्या मुरूमासाठी ५ कि.मी. ची लीड दिलेली असतानाही साईड ड्रेनमध्ये जागेवरच निघालेली काळी माती वापरण्यात आलेली आहे. त्यामुळे या रस्त्यास देखील मोठ्या प्रमाणात भेगा पडतील. हे मी अनुभवी इंजिनिअर या नात्याने सांगू शकतो. या कामात देखरील डस्टचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या रस्त्याचे आर्युमान सुध्दा कमी होईल. या कामामुळे सुध्दा पुन्हा धुळीचे प्रदुषण वाढणारच आहे. या कामाचे मोजमापे (अर्थवर्क, ग्रन्यलर सब ग्रेड, डब्लू, बी.एम. सी.सी., सबबेस सी. सी., एम-३० ट्रिमिक्स) या कामाची जाडी अंदाजपत्रकापेक्षा कमी करणेत आली असतानाही संगनमत करून अंदाजपंत्रकाप्रमाणे देयक देण्याचा फॉर्म्युला परत वापरला गेला आहे. त्यामुळे करदात्या बार्शीकरांच्या खिश्याला पुन्हा कात्री लागणारच आहे.
वास्तविक पाहता सोलापूर जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात सुरू असलेली एन.एच.ए.आय. ची हायवेची काँक्रीट रस्त्याची कामे अंदाजपत्रकापेक्षा १० ते २०% कमी दराने होत असतानाही त्याचा दर्जा उत्कृष्ट राखला जात आहे. हे काम मात्र सत्ताधान्यांनी कंत्राटदाराशी अर्थपर्ण संगणमत करून ९ % जास्तीच्या दराने दिले आहे आणि काम मात्र अत्यंत घाणेरड्या दर्जाचे केले जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागाच्या निविदा अंदाजपत्रकापेक्षा ५ ते २०% कमी दराने होत असताना बार्शी न.पा. च्या सर्व निविदा सरसकट ८ ते ९.९० % जास्तीच्या दराने संगणमताने ‘मॅनेज’ करून दिल्या जातात हे उघड गुपीत आहे. त्यामुळे शासनाचे, न.पा. चे,पर्यायाने जनतेचे १५ ते ३०% एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याकडेही शासनाचे लक्ष वेधणार आहे.
त्यामुळे संबंधित कंत्राटदाराशी संगणमत करून झालेल्या कामापेक्षा जास्तीचे बील तयार करणाऱ्या, निकृष्ट दर्जाचे काम करून नागरिकांच्या जीवनाशी खेळणाच्या निकृष्ट व भेसळयुक्त बांधकाम साहित्य वापरणाऱ्या कंत्राटदाराचे हित साधून पालिकेचे, बार्शीकरांचे नुकसान करणाऱ्या नगरअभियंता व बांधकाम अभियंता यांच्या गैरकारभाराची चौकशी करून कंत्राटदारसह या दोघांवर गुन्हा दाखल करावा. या अधिकाऱ्यांचे निलंबन करावे. या कंत्राटदाराचा ब्लॅक लिस्टमध्ये समावेश करावा अशी मागणी मिरगणे यांनी यावेळी केली.
तसेच या रस्त्यांच्या कामांमुळे होणारे धुळीचे प्रदुषण नागरिकांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक असून या कामाची चौकशी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाने करावी अशीही मागणी आपण करणार असल्याचे मिरगणे यांनी यावेळी सांगितले. नगरपालिका प्रशासन व मा.जिल्हाधिकारी यांनी याची त्वरीत दखल न घेतल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मिरगणे यांनी दिला आहे.