कुतूहल न्यूज नेटवर्क : विजयकुमार मोटे
सोलापूर, दि.१७: मोहोळ, बार्शी, माढा व उत्तर सोलापूर या चार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला सीना-भोगावती जोड कालव्याचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.
सीना-भोगावती जोड कालव्याचे सर्वेक्षण होणार; जलसंपदामंत्र्यांनी दिले आदेश
यावेळी आमदार यशवंत माने, सिना भोगावती जोड कालवा संघर्ष समितीचे नूतन अध्यक्ष डॉ. संदेश कादे, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे-पाटील, माजी जि.प. अध्यक्ष बळीराम साठे, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता एन.व्ही. जोशी, रमेश वाडकर, उजनी-डाव्या कालव्याचे रमेश क्षीरसागर ,जगन्नाथ कोल्हाळ, गोविंद पाटील, विजयकुमार पोतदार, संजय शिंदे आदी उपस्थित होते.
मोहोळ, बार्शी, माढा व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची सिना-भोगावती जोड कालवा करण्याची मागणी मागील जवळ जवळ चाळीस वर्षापासून करण्यात येत आहे. या एकाच विषयावर या कालावधीमध्ये या भागात महाआघाडी व महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदारांचे वर्चस्व होते व आहे. तरीही या विषयावर फक्त बैठका घेतल्या जात होत्या परंतू यावर ठोस निर्णय घेण्यात येत नव्हता. हे पाहून राष्ट्रवादीचे नेते कै. सुशांत कादे यांनी सीना-भोगावती जोड कालवा संघर्ष समितीची स्थापना करून सर्व सूत्रे हाती घेत जोरदार संघर्ष उभा केला होता. त्याचेच फळ आज शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे जिल्ह्यातील सिना-भोगावती जोड कालव्याचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. यामुळे शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
या सीना-भोगावती जोड कालवा योजनेवाषयीची संपूर्ण माहिती मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, सीना-भोगावती जोड कालवा संघर्ष समितीचे नूतन अध्यक्ष डॉ. संदेश कादे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना दिली.