fbpx

सिताफळ लागवडीमुळे हजारो शेतकरी लखपती

एनएमके-१ (गोल्डन)चे जनक डॉ. नवनाथ कसपटे यांची किमया !

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी : सूत गिरण्यांचे मँचेस्टर, मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या बार्शीची ओळख आता ‘सिताफळाचे क्लस्टर’ आणि ‘सिताफळाची बार्शी’ म्हणून होत आहे. याचे सारे श्रेय जाते ते सिताफळाच्या एनएमके-१ (गोल्डन) या वाणाचे जनक डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे यांना. बांधावरच्या या उपेक्षीत फळझाडाला डॉ. कसपटे यांनी फळबागेच्या रांगेत बसवून खऱ्या अर्थान न्याय मिळवून दिला आणि शेतकऱ्यांचा वणवासही संपवीला. एनएमके- १ (गोल्डन) या सिताफळ वाणाची लागवड करून राज्य-परराज्यातील हजारो शेतकरी लखपती आणि करोडपती झाले आहेत.

सिताफळाच्या अनुशांगाने देश व जगभरातून गोरमाळे ( ता. बार्शी, जि. सोलापूर ) येथे येणाऱ्या शेतकरी, व्यापारी आणि उद्योजक यांची संख्या गेल्या काही वर्षात वाढत आहे. दररोज किमान शंभरच्यावर व्हिजीटर (पर्यटक) मधुबन फार्मला भेट देवून भारावून जातात. त्यामुळे एकुणच परिसरातील अनेक व्यावसायिकांचे उत्पन्न या पर्यटकांमुळे बऱ्यापैकी वाढले आहे. विशेषत: परिसरातील हॉटेल, लॉजिंग आणि वाहतुक व्यावसायिकांना याचा चांगलाच फायदा झाला आहे. विशेषत: यंदा सर्व फळांच्या दराचे रेकॉर्ड मोडत एनएमके- १ ( गोल्डन) या वाणाच्या सिताफळाने यंदा ठोक मार्केटमध्ये प्रति किलो २८० रुपये दर मिळविला. हा दर प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळाला असून किरकोळ बाजारात याचा दर याहीपेक्षा उच्चांकी होता. त्यामुळे हे सर्वात महाग विकले जाणारे फळ म्हणून याची ओळख झाली आहे. हाच दराचा मुद्दा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने अल्पावधीत करोडपती करणारे फळ म्हणून एनएमके-१ (गोल्डन) कडे पाहिले जात आहे.

सिताफळाचे अंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिले पेटेंट
गेल्या काही वर्षात देशभरात एनएमके-१ ( गोल्डन) या वाणाच्या सिताफळाची लागवड वाढत आहे. या वाणाला आता अंतरराष्ट्रीय स्तरावरील पेटेंटही मिळाले आहे. विशेष म्हणजे, सीताफळाला मिळालेले हे जगातील पहिले पेटेंट म्हणावे लागेल. त्यामुळे कृषी विद्यापीठस्तरावर मान्यता मिळण्याचा अडसर आता दूर झाला आहे. यामुळे भविष्यात रोपांच्या भेसळीमुळे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबणार असून, एनएमके-१ (गोल्डन) या वाणाच्या लागवडीला शासनाचे अनुदान मिळविण्यास मदत होणार आहे.

कॅलिफोर्नियास्थित कंपनीबरोबर प्राथमिक करार
नुकतेच जर्मनी येथील बर्लिन येथे झालेल्या ‘फ्रुट लॉजिस्टीका’ या अंतरराष्ट्रीय फळ प्रदर्शनात डॉ नवनाथ कसपटे यांनी निर्माण केलेल्या ‘एनएमके-१ (गोल्डन) या सिताफळ वाणाला जागतीक ओळख निर्माण झाली असून, येथे आलेल्या जगभरातील अनेक फळ उत्पादक आणि फळ विक्रेत्या कंपन्यांकडून चक्क ‘एनएमके-१ ( गोल्डन) या वाणाला मागणी करण्यात आली. विशेषत: कॅलिफोर्नियास्थित एका कंपनीबरोबर प्रविण कसपटे यांनी प्राथमिक करार केला असून, रॉयल्टी आणि पेटेंटच्या कायदेशीर प्रक्रियेसाठी कंपनीचे चेअरमन आणि प्रमुख अधिकारी लवकरच मधुबन फार्मला भेट देण्यासाठी येणार आहेत.

प्रशिक्षणाची सुसज्ज व्यवस्था
पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता ‘मधुबन फार्म’वर राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. एकगठ्ठा व्हिजीटर असल्यानंतर लागलीच त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था कोणत्याही क्षणी येथे होते. त्यासाठी स्वतंत्र व सुसज्ज असा प्रशिक्षण हॉल फार्मवर तयार करण्यात आला आहे. येथे प्रत्येक महिन्याला २०० प्रशिक्षणार्थिना एनएमके-१ ( गोल्डन) सिताफळाच्या लागवडीपासून काढणी व विक्री व्यवस्थापनापर्यंतचे प्रशिक्षण व भोजन नियमित दिले जाते.

मधुबन फार्मवर येणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दक्षिण भारातातील शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यांना सिताफळ लागवडीची माहिती त्यांच्या स्थानिक भाषेत सांगण्यासाठी दुभाषीकाची व्यवस्था करण्यात आली आहे. तेलगु, कन्नड, तमीळ, हिंदी व इंग्रजी या भाषेतील दुभाषीक फार्मवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे संभाषणासाठी येणारी समस्या आता दुर झाली आहे.

४२ वाणांचे संकलन
डॉ. नवनाथ कसपटे यांनी १९८५ सालापासून सीताफळाचे विविध वाण संकलन करण्यास सुरूवात केली. सध्या त्यांच्याकडे ४२ वाणाची प्रत्यक्ष लागवड असून, २००२ मध्ये हा प्रात्यक्षीक प्लॉट तयार करण्यात आला आहे. यापैकी २२ वाणाच्या फळाचे त्यांनी पृथकरण (अँनॉलिसीस) केले त्यापैकी बहुतांश वाण फळावर आहेत.

क्रॉस पॉलिनेशनचा प्रयोग
कसपटे यांच्या मधुबन फार्मवर त्यांनी २०१८-१९ मध्ये क्रॉस पॉलिनेशनचा प्रयोग केला आहे. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या ३२ वाणांच्या फुलांमधील पुकेशर संकलन करून त्याचे क्रॉस पॉलिनेशन केले आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या फार्मवरील ३० कर्मचाऱ्यांची टीम तयार करून दररोज पहाटे पुकेशर संकलन केले आणि त्याचे ३२ वाण क्रॉस केले. क्रॉस केलेल्या फुलांना टॅग लावून त्यांचे कोडनंबरची नोंदणी संगणकामध्ये करून ठेवली आहे. त्या फुलांना आलेल्या फळांचे संकलन करून त्यांची नोंदणीनुसार रोपे तयार केली. तयार केलेल्या सुमारे २५०० रोपांची नऊ एकर क्षेत्रावर लागवड केली असून ती सध्या प्रयोगावस्थेत आहे. यातून सिताफळाचे शेकडो नवीन वाण निर्माण होतील असा त्यांना विश्वास आहे. त्यांचे हे काम कृषी विद्यापीठाला लाजवेल असे आहे.

रोपे तयार करणाच्यांवर दंडात्मक कारवाई
डॉ. नवनाथ कसपटे यांना एनएमके-१ ( गोल्डन) या सिताफळ वाणाचा सामित्व हक्क (पेटेंट ) मिळाल्याने आता त्यांच्या परवाणगीशिवाय या वाणाच्या रोपांची निर्मिती, विक्री, जाहिरात, वितरण, आयात व निर्यात कोणालाही करता येणार नाही. विशेष म्हणजे एनएमके-१ (गोल्डन) या वाणाच्या रोपांची निर्मितीही करता येणार नाही. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम ७२ अन्वये दंडात्मक कारवाई होऊन तीन वर्षापर्यंत शिक्षा व २० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

अनेक पुरस्कारांचा वर्षाव
डॉ. कसपटे यांच्या कामाचा गौरव म्हणून राज्यातील विविध संस्थांनी पुरस्कार देवून गौरवीले आहे. २०१७ मध्ये त्यांना भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणातर्फे दिला जाणारा प्लँट जिनोम सेवियार फार्मर अँवार्ड २०१५ हा देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. अशा प्रकारचे लहानमोठे विविध १७ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

बेंगलोर विद्यापठाकडून मानद डॉक्टरेट पदवी
डॉ. कसपटे यांच्या सिताफळातील या कामामुळे बेंगलोर विद्यापठाकडून २०१८ मध्ये चन्नई येथे मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता ११ वी शिकलेला हा शेतकरी आता ‘सिताफळातील डॉक्टर’ म्हणून युवा शेतकऱ्यांसमोर आदर्श ठरला आहे.

सीताफळ महासंघाची स्थापना
डॉ. कसपटे यांनी २००३ मध्ये अखिल महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण व संशोधन संघाची स्थापना केली. १२ वर्षाच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी सीताफळाच्या मुल्यवर्धनासाठी राज्यातील ११०० हून जास्त सीताफळ उत्पादकांना संघाच्या छत्राखाली एकत्र आणले. तसेच राज्यातील विविध भागात १२ राज्यव्यापी व अनेक विभागीय कार्यशाळा आणि सीताफळ परिषदेचे आयोजनही केले. दरम्यान, महाराष्ट्रासह इतर राज्यात सीताफळाचा विस्तार होत आहे; हे लक्षात आल्याने त्यांनी ‘अखिल भारतीय सीताफळ महासंघाची स्थापना केली. या महासंघामार्फत मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश आदी राज्यातील सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना एकत्रत आणण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *