fbpx

चक्क पोलिसांनाच दिली एका दिवसात वर्दी उतरविण्याची धमकी

पिंपरी: पुतण्याच्या घरावर दगडफेक करणाऱ्यास रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसाला धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. तसेच ‘माझ्या खूप ओळखी आहेत. तुझी एका दिवसात वर्दी उतरवेल. गडचिरोलीला बदली करेल’ अशी धमकी देत पोलीस करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपीवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १) रात्री साडेदहा वाजता दिघी रोड, भोसरी येथे घडली. प्रकाश दिगंबर शिंदे (वय ५९, रा. चाकण) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस नाईक उत्तम सायस भाताने (वय ४०) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजता दिघी रोड, भोसरी येथून पिंपरी-चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षात एक फोन आला. एक व्यक्ती घरावर दगडफेक करत असल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार नियंत्रण कक्षातून भोसरी बिट मार्शलवरील पोलीस कर्मचारी उत्तम भताने आणि त्यांचे सहकारी दिघी रोड, भोसरी येथील वर्धमान टेरेस येथे पोहोचले.

आकाश राजेंद्र शिंदे (वय २६, रा. वर्धमान टेरेस, दिघी रोड, भोसरी) यांनी पोलिसांना फोन करून मदत मागितली होती. आकाश आणि त्यांचा आरोपी चुलता प्रकाश शिंदे यांच्यात झटपट चालू होती. पोलिसांनी त्यांचे भांडण सोडवून झाल्या प्रकाराबाबत विचारपूस केली. त्यात आकाश शिंदे यांनी सांगितले की, प्रकाश शिंदे हा आकाश यांच्या घराच्या खिडकीवर दगड मारत आहे. तसेच शिवीगाळ करत आहे.

त्यावेळी आरोपी प्रकाश शिंदे हातात दगड घेऊन थांबला होता. त्याने पोलिसांसमोर आकाश यांच्या घराच्या दिशेने दगड मारले. पोलिसांनी प्रकाशकडे विचारपूस केली असता त्याने फिर्यादी पोलीस नाईक यांना ‘तू पोलीस असला म्हणून काय झालं, तू जरा शिस्तीत रहा. मला प्रश्न विचारायची तुझी लायकी नाही. एका दिवसात तुमची वर्दी उतरवून टाकील. माझ्या खूप ओळखी आहेत. मी तुमची गडचिरोली येथे बदली करुन टाकील”, अशी धमकी दिली.

पोलीस प्रकाश याला समजावून सांगत असताना प्रकाश याने पोलिसांच्या अंगावर धावून जात गचांडी पकडली. ‘तुला माहीती आहे का, मी कोण आहे? तु जरा शिस्तीत रहा. तुला आत्ताच्या आत्ता सस्पेंड करून टाकील, असे म्हणत शिवीगाळ केली आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्यानंतर पोलीस शिपाई तरडे हे आरोपीला अडवित असताना त्यांना देखील प्रकाश शिंदे याने ढकलून देत शिवीगाळ केली. याबाबत गुन्हा दाखल करून आरोपी प्रकाश याला अटक करण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *