fbpx

कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या अतिक्रमण पथकावर दगडफेक; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कुतूहल न्यूज नेटवर्क

चिंचवड प्रतिनिधी (दयानंदगौडगांव) : कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या अतिक्रमण पथकावर पाच जणांनी मिळून शिवीगाळ करत दगडफेक केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.२२) वाकड येथील दत्त मंदिर रोड येथे घडली आहे. या प्रकरणी पाच जणांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सागर शरद वाघमारे, त्याच्या दोन बहिणी आणि अन्य दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ऋषिकेश सुदेशकुमार कांबळे (वय 29) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागात काम करतात. ते त्यांच्या सहकारी आणि वरिष्ठांसोबत दत्तमंदिर रोड, वाकड येथे शरद वाघमारे यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी संशयित आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून येत शिवीगाळ केली. शिवाय एका महिलेने कारवाई करणाऱ्या पथकाच्या दिशेने दगड भिरकावला. याबाबत पाच जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *