fbpx

पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षेसाठी नागरिकांना बंदूक परवाने देणार; पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश

दयानंद गौडगांव : कुतूहल न्यूज नेटवर्क

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या गुन्हेगारी रोखण्यासाठी नवनिर्वाचित पोलीस आयुक्तांकडून अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. त्यात नागरिकांचा सहभाग करून घेण्याचा विचार करीत आहेत. माझे शहर, माझी सुरक्षा, माझी जबाबदारी या अनुषंगाने शहरात गस्तीसाठी थेट नागरिकांचे सहकार्य घेण्यात येणार असून त्यासाठी बंदुकीचे परवाने देण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नवीन असल्याने मनुष्यबळाची समस्या आहे. अधिकारी व कर्मचारी पुरेशा संख्येने उपलब्ध होत नसल्याने पोलिसांवर कामाचा ताण आहे. असे असतानाच शहरात ज्वेलर्सची दुकाने फोडून चोरी, घरफोडी, जबरी चोरी, वाहनचोरी, एटीएम फोडणे, सोनसाखळी चोरी आदी गुन्हे सातत्याने घडत आहेत. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्रगस्तीवर पोलिसांकडून भर दिला जात आहे. मात्र मनुष्यबळ कमी असल्याने त्यावर मर्यादा येत आहेत. त्यासाठी शहरवासीयांची मदत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.अशी माहिती पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली आहे.

यासाठी इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येणार आहे. आठवड्यातून एकदा गस्त घालण्याची तयारी असलेल्या नागरिकांनाच ही संधी मिळणार आहे. शिवाय त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नसावेत. मात्र त्यांना स्वखर्चातून बंदूकीची खरेदी करून घ्यावे लागणार आहे. यामध्ये शहर व ग्रामीण भागात २० ते २५ नागरिकांची टीम तयार केली जाईल. या सर्वांचा एक व्हाट्सअप ग्रुप असेल आणि या ग्रुपचे कंट्रोल पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याकडे असेल.एका रात्रीसाठी किमान दोन नागरिकांचे पथक गस्त घालू शकणार आहे. शहरात मोहल्ला सुरक्षा दल तसेच ग्रामीण भागात ग्राम सुरक्षा दल म्हणून हे पथक कार्यरत राहणार आहे, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *