बीड: सध्या संपूर्ण राज्यभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रेतांना जाळण्यासाठी स्मशानभूमी सुद्धा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सर्व स्तरातून रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त होताना दिसत आहे.
रुग्णालयाकडे दोन रुग्णवाहिका
रुग्णालयात केवळ दोनच रुग्णवाहिका आहेत. कोरोनाचं वाढतं संकट पाहता पाच अतिरिक्त रुग्णवाहिकांची मागणी करण्यात आली आहे. 17 मार्च 2021 रोजी जिल्हा प्रशासनाला चिठ्ठी लिहून अतिरिक्त रुग्णवाहिका देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र अजून कोणताही रुग्णवाहिका मिळालेली नाही, असं रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
या प्रकारामुळे मरण पावल्यानंतरही कोरोना बाधितांची अवहेलना होत असल्याने स्वाराती रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, याच रुग्णवाहिकेतून नंतर रुग्णांचीही वाहतूक होत असल्याने प्रशासनाला कोरोनाला आवर घालायचा आहे की प्रसार करायचा आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.