fbpx

बार्शीत दोन कोविड हॉस्पिटल निर्मितीचे काम सुरू – आमदार राजेंद्र राऊत

कुतूहल न्यूज नेटवर्क

कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी कोविड केअर सेंटर , डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल उभारण्याचे काम सुरू

बार्शी : बार्शी तालुक्यातील जामगाव (आ), वैराग व शेंद्री या तीन गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी वैद्यकीय विभाग, बार्शी नगरपरिषद, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन सद्य परिस्थितीचा, आरोग्य सुविधा व उपाययोजनांचा आढावा घेवून, आणखीन आवश्यक आरोग्यसुविधा व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीत बार्शी तालुक्यात जामगाव (आ), वैराग व शेंद्री या ठिकाणी आढळून आलेल्या कोरोना रुग्णा संदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली.

बार्शी शहर व तालुक्यासाठी कोवीड केअर सेंटर (सी. सी. एच.) व डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल (डी.सी. एच.) हे दोन केंद्र चालू करण्याचे ठरले. यापैकी बायपास लातूर रोड वरील बी. आय. टी. इंजिनिअरिंग कॉलेज याठिकाणी कोवीड केअर सेंटर सुरू करण्याचे ठरले असून त्याचा ताबा घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी या सेंटरची निर्मिती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल (100 बेडचे) वैराग येथे, सोलापूर रोड वरील सासुरे फाट्याजवळील साई आयुर्वेद कॉलेज या ठिकाणी सुरू करण्याचे ठरले असून, शासकीय यंत्रणांची मदत घेऊन हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनची (आय.एम.ए.) मंजुरी घेऊन मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविलेला आहे.

या कोवीड केअर सेंटर व डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल यांमध्ये सेवा देण्यासाठी बार्शीतील खाजगी डॉक्टरांनी तत्परता दाखविलेली आहे. यासाठी त्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. बी.वाय.यादव यांनी या दोन कोवीड हॉस्पिटलला सेवा देणार असल्याचे सांगितले.या आठवड्यात बार्शी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सर्व विभागाच्या प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी काम करत आहे. नागरिकांनी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, शहरातील गर्दी कमी करावी, प्रशासनास सहकार्य करावे. त्यामुळे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनवरील ताण कमी होईल असे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी केले.

बाहेर जिल्ह्यातून, राज्यातून नागरिक आपापल्या गावाकडे, शहराकडे परतत आहेत. अशा व्यक्तींची बार्शी शहर व तालुक्याच्या सीमांवर चेक पोस्टद्वारे पोलीस प्रशासन व आरोग्य प्रशासनाने नोंद घेऊन, त्यांची प्रशासनाने अशा नागरिकांना योग्य माहिती देऊन त्यांना शक्यतो इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन (अलगीकरन) करण्यात यावे. अलगीकरन करण्यात आलेल्या प्रत्येक लोकांकडे 14 दिवसाच्या कार्यकाळात किमान 1 दिवसाआड नगर परिषद, आरोग्य, महसूल, तसेच ग्रामपंचाय कर्मचारी यांनी भेटून त्यांच्या आरोग्याची विचारपूस करावी. शहर व गावांमध्ये तात्काळ फवारणी करावी. तसेच काम करणाऱ्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असेही आमदार राजेंद्र राऊत यांनी बैठकीत सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष आसिफ भाई तांबोळी, पंचायत समितीचे सभापती अनिल काका डिसले, तहसीलदार प्रदिप शेलार, डी.वाय.एस.पी. सिद्धेश्वर भोरे, मुख्याधिकारी शिवाजी गवळी, गटविकास अधिकारी शेखर सावंत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.जोगदंड, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. शीतल बोपलकर मॅडम, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, डॉ. बी.वाय.यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे होनमुटे साहेब, पांगरी आरोग्य उपकेंद्राचे डॉ. ढगे, डॉ.विजय गोदापुरे, डॉ.जगताप तसेच आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *