fbpx

उस्मानाबादेत उमेदच्या रणरागीणींचा भर पावसात मुकमोर्चा

कुतूहल न्युज नेटवर्क

उस्मानाबाद : गट, ग्रामसंघ व प्रभाग संघांना दिला जाणारा निधी वितरित करावा, बाह्यसंस्थेचा हस्तक्षेप थांबवावा, कॅडेरचे थकीत मानधन त्वरित वितरीत करावे, ज्या समूहांना खेळते भांडवल मिळालेले नाही त्यांना निधी द्यावा, अभियानातील कर्मचारी यांची सेवा अविरत सुरू ठेवावी, आदी मागण्यांसाठी उस्मानाबादेत सोमवारी (दि.१२) लेडिज क्लबपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर उमेदच्या रणरागीणींचा मोर्चा धडकला. भर पावसात शेकडो महिलांचा हा मोर्चा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता.

महिलांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला वेगळी दिशा देणारे उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आता बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने अभियानाला जोडलेल्या ५० लाख महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. शासनाकडून मिळणारा निधी ठप्प झाला असून संस्था मोडकळीस येण्याची भीती निर्माण झाली आहे.महिलांच्या संस्था वाचवून महिलांना मार्गदर्शन करणारे हे अभियान निरंतर सुरू राहावे व बाह्य संस्थेचा हस्तक्षेप होऊ नये या मागणीसाठी हा मुकमोर्चा काढण्यात आला. उमेद अभियानाचे जवळपास पाच लक्ष बचत गट, ग्रामसंघ व प्रभाग संघ, राज्य भर उभे झाले आहेत.

यात ५० लाख पेक्षा जास्त महिला जोडल्या गेल्या आहेत. या महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी आणि त्यातून त्यांना शाश्वत उपजीविका निर्माण करून देण्यासाठी अभियानाने समर्पित कर्मचारी व अधिकारी भरती केली. समुदाय संसाधन व्यक्ती, बँक सखी, आर्थिक साक्षरता सखी, कृषी सखी, पशु सखी, ग्रामसंघ लिपीका, कृती संगम सखी यासारखे अनेक कॅ डर ग्रामीण कुटुंबाचे शाश्वत उपजिविकेसाठी विविध उपक्रमाचे माध्यमातून कार्यरत आहेत. शिवाय ३ हजार समर्पित कर्मचारी या महिलांसाठी अहोरात्र झटत आहे. उमेद च्या विविध संस्थांना १४०० कोटी पेक्षा जास्त निधी देऊन राज्य व केंद्र शासनाने महिलांच्या जिवनोन्नतीसाठी प्रयत्न केले आहेत.

आता हजारो महिला स्वतःची विविध उत्पादने निर्माण करून, व्यवसायाची कास धरून आत्म निर्भर होत आहे. मात्र त्यांच्या प्रगतीला नवी दिशा मिळण्याऐवजी आता शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने या अभियानाच्या मुळावर घाव घालण्याचा मार्ग अवलंबलेला आहे. मोठ्या मेहनतीने उभी झालेल्या महिलांच्या संस्था मोडकळीस आणणे आणि अभियानामुळे जीवनमान उंचावलेल्या महिलांचे खच्चीकरण करणे हा प्रकार आहे.

यामुळे सरकार बद्दल तीव्र आक्षेप घेतला असून शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. शहरातील लेडीज क्लब येथून सकाळी ११ वाजता हा मुकमोर्चा निघाली. यावेळी पाऊस सुरु झाला होता. अशा पावसातही छत्रीचा आधार घेत तर काहींनी चक्क भिजत जिल्हाधिकारी गाठले. त्यानंतर जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *