दयानंद गौडगांव : कुतूहल न्यूज नेटवर्क
हैद्रा येथील सैफुल मुलूक बाबांचा उरूस महोत्सव यंदा साध्या पध्दतीने
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील हजारो हिंदू-मुस्लीम भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या हैद्रा (ता. अक्ककोट) येथील ग्रामदैवत ख्वाजा सैफुल मुलूक बाबांचा उरूस महोत्सव यंदा करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे साध्या पद्धतीने साजरा होत आहे.
दरवर्षी अगदी थाटामाटात हा उरुस साजरा केला जातो. परंतु यंदा करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शासकीय नियमांनुसार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार उरूसात प्रातिनिधीक स्वरूपात धार्मिक विधी, निवडक मंडळींच्या उपस्थितीत होणार आहे. शनिवार दि.९ जानेवारी रोजी संदल (गंध) आणि दि.१० जानेवारी रोजी, रविवार ‘चिरागा’चा मुख्य कार्यक्रम होणार आहे आणि दि.११ जानेवारीला प्रसाद वाटपाचा कार्यक्रम असणार आहे .
यामध्ये कावली व अन्य कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. करोना प्रादुर्भाव आणि शासकीय नियम व अटींचा विचार करून उरूसात बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षित अंतर ठेवणे, तोंडाला मास्क लावणे व सैनिटायझर चा वापर करणे या गोष्टी अनिवार्य असतील. शिवाय दर्ग्याचे मुख्य द्वारही बंद ठेवण्यात येणार आहे.त्यामुळे भाविकांना बाहेरूनच दर्शन घेता येणार आहे, तसेच भाविकांनी गर्दी करण्याचे टाळावे व व्यवस्थापन समिती ला सहकार्य करावे असे आवाहन सैफल मलुक दर्गाहचे प्रमुख मिरासाहब मुजावर यांनी केले आहे.