कुतूहल न्यूज नेटवर्क
उत्तम कांबळे खून प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर; पांगरी शिवारात विहिरीत आढळला होता मृत्यदेह
बार्शी : पिंपळगांव (दे) येथील उत्तम नारायण कांबळे वय ५५ वर्षे, यांचे खून प्रकरणातील संशयीत आरोपी शिवाजी भिमराव बोकेफोडे व रवी शिवाजी बोकेफोडे राहणार धोत्रे, आबा उर्फ राहुल उद्धव माने राहणार पिंपळगांव (दे) यांची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील यांनी दिले आहेत.
दि. ८ ऑगस्ट २०२० रोजी जैनुद्दीन गनी शेख रा पांगरी यांनी त्यांचे शेतामधील विहीरीमध्ये अनोळखी इसमांचे प्रेत विहीरीतील पाण्यावर कुजलेल्या अवस्थेत तरंगत आहे, अशी खबर पांगरी पोलीस स्टेशनला दिल्यानंतर अकस्मात मयत तपास सुरु होऊन सदर विहीरीतील प्रेत काढण्यात आले, सदर प्रेताचा गळ्याजवळ केबल वायरने फास देवून गाठ मारलेली दिसत होती. उजव्या हातात राखी बांधलेली होती. प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी जागीच शव विच्छेदन केले.
सदर अनोळखी मयताची चौकशी करताना मयताचा मुलगा संतोष कांबळे, पत्नी प्रभावती कांबळे यांनी राखी व कपडे ओळखल्याने मयत इसम उत्तम नारायण कांबळे असल्याचे निष्पन्न झाले. सबब सदर व्यक्तीस अनोळखी इसमांनी जिवे ठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने विहीरीत गळ्याला वायर बांधून टाकून दिल्याचे निष्पन्न झाले, अशा आशयाची फिर्याद पोलीस उपनिरिक्षक प्रविण शिवाजी शिरसट यांनी दि. ११ ऑगस्ट २०२० रोजी दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपींना दि. १२ ऑगस्ट २०२० रोजी पांगरी पोलीसांनी अटक केली होती.
आरोपींच्या वतीने अँड. प्रशांत शेटे यांनी जामीनासाठी अर्ज अति. सत्र न्यायालय बार्शी येथे दाखल केला आरोपीच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की, उत्तम कांबळे यांचे वय ५५ वर्षे आहे तर विहीरीतील प्रेताचे शवविच्छेदन अहवाल तथा इन्क्वेस्ट पंचनामा यात वय ३५ ते ४० वर्षे असे नमूद आहे. त्यामुळे मयत व्यक्ती ही उत्तम कांबळे नसून अन्य कोणीतरी आहे. जी व्यक्ती मयत आहे की नाही हे निश्चीत नसताना त्याचा खून झाला म्हणून त्याच्या तथाकथीत खूनाची शिक्षा संशयीत आरोपींना देता येणार नाही.
चार्जशीटमध्ये जाणीवपुर्वक पोलीस अधिकाऱ्यांनी अनोळखी प्रेताच्या शरीराचा फोटो मे. कोर्टात दाखल केला नाही. ही सर्व परिस्थीती संशयास्पद आहे. पंचनाम्यात प्रेताचा रंग नमुद नाही. शवविच्छेदन अहवालात मृत्यूची अंदाजे वेळ व तारीख नमुद नाही. एक सारख्या राख्या बाजारात उपलब्ध असतात. आरोपींचा या खूनाशी काहीही संबंध नसून खूनाचा हेतु स्पष्ट होत नाही. अशा प्रकारचा युक्तिवाद आरोपींच्या वतीने करण्यात आला.
अशा परिस्थितीत नेमकी हत्या कोणाची झाली ? हे गुढ आणखी रहस्यमय होत चालले आहे. अशा रहस्यमय प्रकरणातील आरोपींचे वकीलांचा युक्तीवाद ऐकुन घेऊन अति. सत्र न्यायाधीश यांनी सदर तीन्ही संशयीत आरोपींना रुपये ३०,०००/- चे वैयक्तिक बंधपत्र तथा रुपये १५,०००/- च्या प्रत्येकी दोन जामीनदार देणेचे शर्तीवर जामीन अर्ज मंजूर करण्याचे आदेश दिले.