कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील युवा लेखक अहमद शेख यांच्या पहिल्याच ‘भट्टी’ या कादंबरीला विदर्भ संस्कार भारतीचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार घोषित झाला आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह तसेच प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, लवकरच नागपुरात हा पुरस्कार अहमद शेख यांना प्रदान करण्यात येणार आहे.
बार्शीतील अहमद शेख यांच्या ‘भट्टी’ कादंबरीला विदर्भ संस्कार भारतीचा पुरस्कार
या पुरस्कारामुळे पत्रकार अहमद शेख यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अहमद शेख यांच्या भट्टी कादंबरीतील काही शब्द आणि वाक्यांचा परिचय केवळ ऐकिव माहितीतून झालेला असतो. शहरी मध्यमवर्गाशी तर अशा अनेक गोष्टींचा संबंध नांवालाही येत नाही. अवैध दारू गाळण्याचा व्यवसाय, त्यात अडकलेल्या कुटुंबांची ससेहोलपट, भ्रष्ट व्यवस्थेकडून या धंद्याचे होणारे पोषण आणि धंदेवाल्यांचे शोषण या आजवर मराठी साहित्यात तुलनेने अस्पर्शित राहिलेल्या विषयाचे अहमद शेख यांनी विलक्षण बारकाव्यांनिशी आपल्या ‘भट्टी’ या कादंबरीत वर्णन केले आहे.
लपून छपून विशेषतः पोलिसांच्या ‘अधिकृत’ नजरा चुकवून गावाबाहेर लागणारी ही ‘भट्टी’च या कादंबरीची नायिका आहे. बार्शी, वैराग परिसरातील सर्व कथानक फिरते ते तिच्याभोवती. जल्या व लक्ष्या ही भट्टी लावण्यात हातखंडा कमावलेली जोडगोळी, पोराच्या शिक्षणासाठी आग्रही असणारी आणि आजूबाजूच्या लोकांना वेडगळ समजुतीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारी जल्याची बायको अमीना, चुणचुणीत फिऱ्या ही या कादंबरीतील प्रमुख पात्रे. गावपातळीवर सुखदुःखाच्या चक्रात सारखाच घुसळून निघणारा व म्हणूनच एकमेकांच्या आधाराने राहणारा हिंदू व मुस्लिम समाज अहमद यांनी कमालीच्या ताकतीने उभा केला आहे.
या कादंबरीला लक्षवेधी सुरुवात नाही तसा कोणता नाट्यमय शेवटही नाही. एका दुर्लक्षित खेड्यातील काही उपेक्षित कुटुंबांच्या जीवनप्रवासाचा एक तुकडा लेखकाने फक्त जसाच्या तसा आपल्यापुढे ठेवला आहे. तो वाहता आहे. कुणाला पकडलं, कुणी पोलिसांच्या मारहाणीत दगावलं, कुणी बेपत्ता झालं तरी त्या आजूबाजूच्या माणसांना दुःख कुरवाळण्याचीही मुभा नाही. त्यांना अशी चैन मुळातच परवडत नाही. ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मार्ग काढतात व जगत राहतात. हे असे जगणे मराठी साहित्यात विरळच वाचायला मिळते.