कुतूहल न्यूज नेटवर्क
गेली तीन दशके नाविंदगी गावाला अविरत सेवा देणारे पोस्टमन विठ्ठल काका
आज सांगायला खूप अभिमान वाटतोय, गेल्या अनेक दशकांपासून अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी गावात अतिशय प्रामाणिक, मनमिळाऊ आणि अविरत सेवा देणारे पोस्टमन विठ्ठल तळवार काका हे आज सेवा निवृत्त होत आहेत.
सन १९९० पासून ते २०२१ पर्यंतच्या या दिर्घकाळात त्यांनी संपूर्ण गावकऱ्यांची मने जिंकली आहेत. अगदी मी लहान पणापासून पोस्टमन काकांना ओळखतो. नाविंदगी-नागणसूर-नाविंदगी असा जेमतेम सहा किलो मिटरचा पल्ला पोस्टमन काका रोज चालत जायचे. कारण गावाच्या टपाल पेटीत येऊन पडलेली पत्रे पुढे पाठविण्यासाठी त्यांना दररोज नागणसूरला जावं लागायचं. पण एवढे चालून सुद्धा न थकता अगदी वेळात गावात घरोघरी आलेले टपाल वाटत फिरायचे. आणि गावकऱ्यांचाही पोस्टमन काकांवर अतिशय विश्वास होता. त्यामुळे घरी आलेले टपाल गावकरी पोस्टमन काकांकडून वाचून घ्यायचे. काका ही आपली कर्तव्ये बजावत पत्रातील मजकूर समजून सांगायचे.
पोस्टमन विठ्ठल काकांच्या कामाची वेळच ठरलेली नसायची. कधी पहाटेच कुणाचं पत्र लिहायचं असायचं , तर कधी कुणाचं रात्रीच. तर कधी कुणाच्या वस्तीवर टपाल वाटपाला जावं लागायचं. इतकं करूनही पोस्टमन काका थकत नव्हते. तर कधी कोणाला नकारत ही नव्हते. गावकरी परगावी गेलेले असले तरी आलेला एखादा महत्वपूर्ण टपाल परत न पाठवता आठ दहा दिवस त्यांच्याकडेच पडून रहायचं. पण आतापर्यंत पोस्टमन काकांकडून एकही कागदपत्रांचा घोळ झालेला रेकाॅर्ड नाही. शिवाय आजपर्यंत पोस्टात उघडलेल्या खात्यांची पासबुक सुध्दा गावकरी पोस्टमन काकांकडेच ठेवून जातात. त्याचं कारण विश्वास हाच आहे.
मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच आहे की, माणूस आपल्या नावाने किंवा संपत्तीने ओळखत नसून कर्तव्य आणि माणूसकीने ओळखला जातो. आज पोस्टमन विठ्ठल काकांचा कार्य सुध्दा नाविंदगी गावकऱ्यांच्या मनाला भावणारा आहे. अलिकडच्या काळात त्यांना वरिष्ठ पद सुध्दा मिळाला होता, तरी देखील त्याचा अहंकार न बाळगता ते आजपर्यंत ऑफिसमध्ये स्वतः झाडू देखील मारतात. त्यांच्या कामावरची असलेली निष्ठा, श्रद्धा आणि प्रामाणिकपणाला गावकरी सलाम करतात. आज ते सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यांनी आजतागायत केलेल्या निष्ठावंत कार्याला माझा सलाम, त्यांच्या आयुष्याचा उतारवय त्यांना आनंददायी आणि सुखमय वातावरणात जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!
दयानंद गौडगांव- नाविंदगी