दयानंद गौडगांव : कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूरात आयटी कंपन्या उभारण्यासाठी प्रयत्न करू : आमदार रोहीत पवार
अक्कलकोट प्रतिनिधी दि.२९ नोव्हेंबर : सोलापूर जिल्ह्यातून दरवर्षी पाच ते सहा हजार युवक पदवी घेऊन बाहेर पडतात. तसेच यामध्ये अभियांत्रिकी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्याही जास्त आहे. मात्र सोलापूर शहरात आयटी कंपन्या नसल्यामुळे त्यांना नोकरीसाठी बाहेरच्या जिल्ह्यात स्थलांतर करावा लागतो. यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील युवकांना आपल्याच शहरात नोकरी मिळावी यासाठी जिल्ह्यात आयटी इंडस्ट्री उभारण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा विश्वास काल आमदार रोहीत पवार यांनी व्यक्त केला आहे.
विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी सोलापुरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात मेळावा घेतला. या मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सोलापूर शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, मोहोळ तालुका पंचायत समितीचे सदस्य अजिंक्यराणा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार रोहित पवार म्हणाले, आयटी इंडस्ट्री व येथील एमआयडीसीच्या माध्यमातून सोलापूर शहर व परिसरातील जास्तीत जास्त युवकांना रोजगार देण्यासाठी आपण प्रयत्न करू, याशिवाय येथील एमआयडीसीमध्ये अधिक उद्योग आणण्यासाठी देखील आपण प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.