कुतूहल न्यूज नेटवर्क
धक्कादायक घटना ; मळणी यंत्रात अडकून महिलेचा जागीच मृत्यू
माढा : माढा तालुक्यातील बुद्रुकवाडी गावातील विमल विलास आतकरे शेतातील सोयाबीन करत असताना मळणी यंत्रामध्ये केस व डोक्याला बांधलेला स्कार्फ अडकून डोक्याचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दि. 2 ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील विष्णु दळवी यांच्या शेतात सोयाबीनचे खळे करण्यासाठी बाबासाहेब उंदगे यांचे मळणी यंत्र आले होते. यावेळी दळवी यांनी शेताशेजारील विमल विलास आतकरे वय 48 या महिलेला सोयाबीनचे खळे करण्यासाठी बोलवले होते.
सोयाबीन मळणी करण्याचे काम सुरू झाल्यानंतर 2 – 3 पोती सोयाबीन झाल्यानंतर अचानक आतकरे यांच्या डोक्याला बांधलेला स्कार्फ व केस मळणी यंत्राच्या शाफ्ट मध्ये अडकले. परंतु मशीनचा वेग जास्त असल्या कारणामुळे आतकरे मशीन मध्ये ओढल्या जाऊन डोक्याचा चेंदामेंदा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेने माढा तालुक्यातील मानेगाव परिसरामध्ये शेतकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे. विमल आतकरे यांच्या पश्चात दोन मुले, पती व सासु-सासरे असा परिवार आहे .