fbpx

खिशात पैसे ठेवून घेणारी महिला वाहतूक पोलीस निलंबित

कुतूहल न्यूज नेटवर्क

चिंचवड प्रतिनिधी: पिंपरी मधील साई चौकात वाहतुकीचे नियमन करत असताना एका वाहतूक पोलीस महिलेने कारवाई न करण्यासाठी एका तरुणीकडून पैसे घेतल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर झळकला आणि तो व्हिडिओ शहरात चर्चेचा विषय बनला. त्याबाबत वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात आली असून कसुरी अहवाल सादर केल्यानंतर गुरुवारी रात्री संबंधित वाहतूक पोलीस महिलेचे निलंबन करण्यात आले.

स्वाती सोन्नर असे निलंबन झालेल्या वाहतूक पोलीस महिलेचे नाव आहे. त्या वाहतूक शाखेच्या पिंपरी विभागात कार्यरत आहेत. सोन्नर आणि त्यांचे सहकारी वाहतूक पोलीस मंगळवारी (दि. 15) पिंपरी मधील साई चौकात कर्तव्य बजावत होत्या. दरम्यान तिथे एका मोपेड दुचाकीवरून दोन तरुणी आल्या. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे संबंधित वाहतूक पोलीस महिलेने त्यांना सांगितले.ही कारवाई टाळण्यासाठी काही रक्कम घेण्याची तोड निघाली आणि त्या वाहतूक पोलीस महिलेने अनोख्या पद्धतीने ती रक्कम स्वीकारली.

एका तरुणीने चक्क वाहतूक पोलीस महिलेच्या खिशात पैसे ठेवले आणि पोलीस महिलेने ते स्वीकारले असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत हा व्हिडीओ जाऊन पोहोचला आणि नंतर कारवाईची प्रक्रिया सुरु झाली.सहाय्यक आयुक्तांनी याबाबत कसुरी अहवाल उपायुक्तांकडे सादर केला.त्यावर निर्णय घेत सोन्नर यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती गुरुवारी (दि. 17) रात्री उशिरा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *