सांगली: स्वयंपाक का केला नाहीस म्हणून पतीने पत्नीला बॅटने मारहाण केली. या मारहाणीत पत्नी कोमल राहुल जाधव (वय 21 वर्ष) हिचा उपचारादरम्यान मृत्य झाला असून याप्रकरणी पोलीसांनी संशयित आरोपी पती राहुल बाळासो जाधव (वय 25 वर्षे) याला अटक केली आहे. हा प्रकार सांगली जिल्ह्याच्या कुपवाड भागातील अहिल्यानगर झोपडपट्टीत घडला.
स्वयंपाक न केल्याच्या किरकोळ कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. स्वयंपाक का केला नाहीस, मला भूक लागली आहे, असं विचारत नशेत असलेल्या पती राहुल जाधवने रागाच्या भरात पत्नी कोमलला घरात असलेल्या बॅटने मारहाण केली. तसंच शिवीगाळ करत, तुला घरात ठेवणार नाही अशी धमकी दिली होती.
यानंतर कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात कोमलने राहुलविरोधात तक्रार दाखल केली. तर कोमलला उपचारांसाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान कोमलचा मृत्यू झाला.
पोलीसांनी पती राहुल जाधव याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. कुपवाड एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.